Tuesday, 30 August 2022

दोबारा

#दोबारा#

#Dobara

#2:12
#Mirage




Time Travel : Checked!
Alternate Reality : Checked!
Parallel Universe : Checked!
Chaos Theory : Checked!
Butterfly Effect : Checked!
Anurag & Tapasi : Cherry on the cake. (मला दूध आवडत नसल्याने दुधात साखर असं लिहिलेलं नाही, कुणाच्या भावना दुखल्यास क्षमस्व,)

और क्या चाहीये अपने को!

गेल्याच आठवड्यात शिवराजनं #Mirage बद्दल सांगितलेलं, time travel वर आहे पिच्चर म्हणून. Watchlist मध्ये होताच पडून बरेच दिवस, बघणारही होतो रिकमंडेशनही मिळाल्यामुळे. तेवढ्यात आज दोबारा पहिला! सुरुवातीलाच mirage वरून adapt केला असल्याचं वाचलं, आणि भरून पावलो.

अर्थात spoil अजिबात करणार नाही. ट्रेलर बघून वरील themes आहेत हे समजेलच. मान्सून शुटआउट आणि JL50 नंतर वरील थिम्सवर आलेला बहुतेक तिसरा चांगला हिंदी पिच्चर / सिरीज असेल. तापसी पन्नूचा काय प्रेझेन्स आहे राव! चांगला दिग्दर्शक कलाकारातील अभिनेत्याला बाहेर काढू शकतो, त्याला खुलवू शकतो. राहुल भट, सुकांत गोएल ज्यांची नावंही आधी माहिती नव्हती, ती आज जाणून घ्यावी वाटली,  त्यांचा अभिनय आवडला. सास्वता चटर्जी तर कहानीमधील बॉब बिस्वासमुळं ओळखीचे होतेच, त्यांचंही नाव आज समजलं. AK vs AK मध्ये अनुराग ने स्वतःला सस्ता टारांटीनो म्हणवून घेतलं होतं! आता त्याला गरिबांचा नोलान म्हणायला हरकत नाही! अर्थात, jokes apart, पिच्चर चांगलाच आहे.




दोबारा पाहून आल्यानंतर लगेच netflix वर mirage ही पहिला. "During the Storm" या इंग्रजी अर्थाच्या मूळच्या "Durante la tormenta" नावाच्या स्पॅनिश चित्रपटाचं इंग्रजीतील mirage हे नाव. मृगजळ, आभास या अर्थानं. Mirage हे इंग्रजी नाव मूळ स्पॅनिश नावापेक्षा जास्ती समर्पक वाटतं.  Mirage मध्ये एक संभाषण आहे. सिनेमातील प्रोटागोनिस्ट समांतर विश्वातील पर्यायी वास्तवात गेलेली आहे.  Time travel आणि वरील themes या विषयावर एक कादंबरी लिहिलेल्या physics च्या प्रोफेसर असलेल्या लेखिकेला ती भेटते. तेव्हा त्या दोघी वरील विषयांच्या शक्यतेबद्दल बोलत असतात. त्या प्रोफेसरचा खरंच असं काही घडू शकेल यावर विश्वास नसतो. तेव्हा Time travel च्या संदर्भात प्रोटागोनिस्ट प्रोफेसरला सांगते, "माझं अस्तित्व आहे (पर्यायी वास्तवात- alternate reality मध्ये), आणि तिला काही फोटो  दाखवत म्हणते की हे फोटोसुद्धा हेच सिद्ध करतात." यावर ती प्रोफेसर उतरते, "यातून काहीच सिद्ध होत नाही. आपण अर्थ लावत असतो. आपल्याला एवढंच माहितीये की आपला मेंदू जे अनुभवतो, त्याला तो खरं मानतो. तो एखाद्या आभासाला खरं समजतो. जर वास्तव हाच आभास असला तर काय होईल?" तिचं उत्तर (की प्रश्न!) ऐकून जुनेच प्रश्न परत समोर येतात - खरं काय आहे? स्वप्न खरं असतं? भूतकाळात काहीही घडून गेलेलं ते आपण जेव्हा आठवतो, तेव्हा ती फक्त कल्पना असते. जे सगळं घडलं ते जसंच्या तसं प्रत्येक बारीक तपशीलासह आठवत नाही, आणि कित्येक वर्षांनंतर तर खूपच पुसट आठवणी राहतात, बऱ्याचदा चुकीचंही आठवतं, मग भूतकाळातील आठवण ही कल्पनाच असते का खरं असतं? भविष्यात काही गोष्टी घडणार असे ठोकताळे आपण बांधतो, पण अगदी तसंच अजिबात घडत नाही, कारण भविष्याचं मनात येणारं चित्र हीसुद्धा कल्पनाच असते. खरं काय असतं? अस्तित्व काय असतं? असे अस्तित्ववादी प्रश्न काही प्रमाणात mirage निर्माण करतो. तसंच "Hilbert Space" , "Theory of cosmic web by Richard Gott" यांचा जाताजाता उल्लेख येतो. अर्थात हे उल्लेख उगाच जाताजाता केलेले नसतात. याबद्दल मी अजून समजून घेणं बाकी आहे. नारळीकरांची विज्ञानकथा वाचल्यानंतर ती कथा ज्यावर बेतली आहे, ती वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्याची इच्छा व्हावी, तशी इच्छा चांगला sci - fi (आणि त्यातल्या त्यात वरील themes वर असल्यावर) चित्रपट पाहिल्यावर होते. तरीही mirage मध्ये विज्ञानातील संकल्पनानांचा उल्लेख चवीपुरता वापरलेला आहे, जास्ती भर अशा themes मधून निर्माण होणाऱ्या भावनिक नाट्यावर  आहे. नोलनभाऊंचा interstellar पाहिल्यावर नंतर त्याची पारायणे करताना "warmhole", "blackhole", "gravitational time dilation" , "Murphy's law" अशा वैज्ञानिक-तत्वज्ञानविषयक संकल्पनांबद्दल समजलं. Interstellar  साठी नोलनभाऊंचे किप थॉर्न  हे सल्लागार होते. ज्यांना त्यांच्या भौतिकशास्त्रातील योगदानासाठी नंतर नोबेल मिळाला. नोलननी चित्रपटात दाखवलेल्या गोष्टी वैज्ञानिकदृष्ट्या जास्तीत जास्त अचूक होण्यासाठी त्यांचा सल्ला घेतला होता. Interstellar मध्ये दाखवलेलं कृष्णविवर (black hole) किप यांच्या सल्ल्याने गणितं मांडून कसं दिसत असेल तसं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. Interstellar साठी नोलनने ५०० एकर मका लावली होती! चित्रीकरणानंतर ती विकुनही नफा मिळवला होता. नोलनबद्दल, Interstellar बद्दल किती बोलायचं! Interstellar चे visuals, हान्स झिमरचा sonudtrack याबद्दल काय बोलायचं!




असो, तर सांगायचं काय होतं की mirage मध्ये विज्ञानातील संकल्पनांचा ओझरता संदर्भ, तत्वज्ञानावरील भाष्य असं काही होतं. त्यामुळं त्याला आणखी मिती मिळाल्या. दोबारामध्ये तशी काही चर्चा असती तर आणखी मजा आली असती.अर्थात, दोबारामध्ये वरील विषयांवर जास्त भाष्य नसलं तरी राजकीय टिपणी अवश्य आहे. Mirage मधील एका प्रसंगात नसणारी ओळ अनुरागने चपखलपणे दोबारामधील अशाच एका प्रसंगात टाकलीय. दोबारामध्ये पोलीस चौकशीच्या एका प्रसंगात, ज्याची चौकशी चालू आहे तो म्हणतो "I want to talk with my lawyer" तेव्हा पोलीस अधीकारी त्याला उत्तरतो "ये अमरीका नही है, यहा ऐसेही किसीकोभी उठाके अंदर डालते है, तुम्हारा तो सबुत मिला है.." तसंच अनुरागने सिनेमामध्ये त्याचा सिग्नेचर डार्कनेस आणला नाही, तरी एक ओझरता प्रसंग आणि "जरूरत इंसान को जल्लाद बनाती है" असा हिंसेवर भाष्य करणारा डायलॉग होताच.

बाकी चांगलाच आहे दोबारा. सिनेमाच्या नाव पडद्यावर दिसण्याची वेळ, पद्धत आणि नाव सगळं मजेशीर आहे. मूळ mirage मध्ये नसलेले terminator, डॉक्टर Strange, ख्रितोफर नोलन यांचे उल्लेख अनुरागने tribute म्हणून आणि खूप मजेशीर पद्धतीने टाकलेत. माझ्या आवडत्या themes वर असणारा हिंदीतील, आणि त्यात अनुरागचा आणि तापसीचा पिच्चर! आवडेल असं अपेक्षित होतं, आणि अपेक्षाभंग अजिबात झाला नाही.

तळतीप : बॉयकॉट केलेला आणि पाहिलेला दुसरा पिच्चर चांगला निघाला. (लाल सिंग चढ्ढा चांगला होता. आमिरचा forrest चा प्रयत्न बऱ्यापैकी होता. भारतातील घटना आणि भारतीय संदर्भातील बदल अतुल कुलकर्णींनी चांगले केलेत.) सदर तळतीप  अत्यंत मर्यादित डेटावरील निरीक्षण असून याला णिशेदात्मक, राजकीय इत्यादी लिखाण समजू नये. तसा समज झाल्यास होणाऱ्या त्रासाची जबाबदारी सदर लिहिणारा घेत नाही.

- अभिजित कदम.
३०.०८.२०२२.

Wednesday, 27 July 2022

त्रिज्या


 त्रिज्येच्या मर्यादेत हवं तेवढं स्वातंत्र्य उपभोग. स्वातंत्र्य; मर्यादित!

मग माझ्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा ठाकतो, मी का आहे? मी आहे का? आणि मग क्षणस्थ होताना मिळतो अस्तित्वाचा पुरावा, पण अर्थ मात्र गवसत नाही. अर्थाच्या शोधात दिसतात कित्येक वर्षांत न बदललेले तेच संघर्ष, विकासाची व्यक्तिनिष्ठ व्याख्या, शिक्षणाचं टोकन देऊन लग्नाच्या बाजारात दाखवले जाणारे प्रॉडक्ट्स. जगण्याची गर्दी, गर्दीतलं जगणं, जगण्याचा स्तर? दिवसांचे रकाने भरणारी कॅलेंडरं एकामागून एक दिवस सरकवत पुढं जाताना तोच दिवस परत परत - व्यवहाराला मान्य असणारा, जगण्याची आसक्ती ज्यासाठी - व्यवहाराला ते अमान्य. जास्त काही नको, निदान जगणं सहन करण्याइतपत तरी सगळं असावं. व्वा!


डोळ्यात भरणारे लॉंग शॉट्स, झाडींनी वेढलेल्या नदीवर पावसाळी अंधारात वाढत जाणारं धुकं आणि त्यातून प्रकट होणारा अवधूत, कातरवेळी अस्ताव्यस्त पसरलेल्या शहराच्या मागं जमलेले काळे ढग आणि त्यातून लख्ख चमकणारी वीज आणि आवाज, नेमाडे सरांच्या कवितेतील लांब लांब रस्ते, विस्तीर्ण माळरान आणि आभाळाच्या पार्श्वभूमीवर चालत जाणारा ठिपक्यासारखा अवधूत, पुलावरून जाणाऱ्या रेल्वेचं पाण्यातील प्रतिबिंब, रेल्वेतील खिडक्यांतून - माणसांच्या गर्दीच्या हलत्या कोलाजमधून दिसणारा अवधूत, रस्त्यावरील वाहनांच्या पलीकडं चौकटीतून दिसणारा तुमच्या माझ्यासारखा शंभरातील नव्यांनवांसारखा अवधूत, क्षणस्थ होऊन पाण्याचा आवाज ऐकणारा - घड्याळाची टिकटिक ऐकणारा अवधूत - जणू काही ही चित्रं असावीत अवधुतच्या न दिसणाऱ्या मनाला दाखवणारी, दुर्मिळ विशेषांच्या मध्ये भरभरून  साचलेला  मॅट्रिक्स - भुसा दाखवणारी, या चित्रांना जिवंत करणारा आवाज, ध्वनी - पावसाला जिवंत करणारा, मॅट्रिक्स जाणवू देणारा, क्षणस्थ होऊ देणारा. अधूनमधून येणारं लोकसंगीत.


अतिशय संथपणे पॅन होणारा - थांबणारा - जिवंतपणा टिपणारा कॅमेरा, फॅक्टरीमधील - गुऱ्हाळतील प्रक्रिया दाखवत अदृश्य असणाऱ्या हाडामासाच्या माणसापर्यंत पोहोचणारा, विकासाच्या खालच्या टोकाला असलेल्या अंधारातून बाहेर निघत विकासाच्या वरच्या उजेड्या बाजूखालून जात या दरीविरुद्ध पुकारलेला एल्गार दाखवणारा कॅमेरा, आदिम प्रेरणा दाखवणारे पुराणकथांतील चित्रकथीतील प्रसंग, देशीवादाशी नातं सांगणारा फिरता सिनेमा-चित्रकथी-बसमधील हिंदू ते ही चित्रकथी.


इबिझ च्या लेक्चरला गेलेलो मी, त्यावेळी पाहिलेले - दुपारी गुड मॉर्निंग म्हणायला लावणारे तथाकथित मोटीवेशनल वक्ते, आणि कोट घालून टाळ्या वाजवणारे चेहरे, त्यातलाच एक चेहरा, धावणाऱ्या शहराला पकडू पाहणारा डोळ्यात निष्पाप भाबडेपणा असलेला तो चेहरा, या चेहऱ्याकडे पाहणारा - धावून दमछाक झालेला - स्वप्नाळू आदर्शवादी बुरखा फाटून वास्तवाने रापलेला दुसरा चेहरा. असा चेहरा आपलाच चेहरा असल्यासारखा मिरवणारा जगण्याची निरार्थकता- अपरिहार्यता अंगात मुरवून घेतलेला, गावाचा पीळ न सुटलेल्या जिभेचा, अवधूत अंगात भिनलेला अभय महाजन. 


आपल्या मनातला माणसातला मातीतला अनुभव घेऊन, खोल खोल जात, उंच उंच जाऊन कियारोस्तामीजवळ नेणारा वैश्विक अनुभव देणारा अक्षय इंडीकर. 


त्रिज्या आला म्हणून पुन्हा एकदा मुबी घेतलं, पुन्हा एकदा पाहीन, आणखी काही नव्याने दिसेल. 


कुठलीही गोष्ट ऐकताना, पाहताना आपल्या जगण्याचे संदर्भ नकळत जोडले जाऊन आपला अनुभव तयार होत जातो. कदाचित गोष्ट संगणाराला वेगळं काही अपेक्षित असतं, आणि आपण आपल्या संदर्भाच्या चष्म्यातून पाहताना काही वेगळं पाहतो, ऐकतो. गोष्ट सांगणाऱ्याला सांगायचं ते खर आहे, मलाही तेच दिसलं तर तेही खरं. पण मग मला वेगळं दिसलं, तो अनुभव तर खरा होता, मग मला दिसलेली ऐकू आलेली गोष्ट खरीच असेल ना? आणि दुसऱ्या ऐकणारा-पाहणाऱ्याला वेगळं दिसलं -ऐकू आलं तर ते काय? 

खरं काय, खोटं काय, आपलं अस्तित्व खरं आहे का?

तुम्ही आहात कशावरून? तुमच्या असण्यावर शंका घ्या. 

असो, अस्तू!


- अभिजित कदम.

Saturday, 9 July 2022

FRIENDS

 #FRIENDS25


आपल्या जगण्यात एक अशी अवस्था येते की सगळं निरस वाटू लागतं, कशातच उत्साह वाटत नाही. मन कुठल्याश्या कारणानं निराश झालेलं असतं. बरेच दिवस राहणारी अवस्था असते ही. अशाच मनस्थितीत असताना माझ्या मित्रानं, किरणनं मला friends सिरीयल बद्दल सांगितलं. मी माझ्याच कोशात होतो. "असेल काहीतरी बघू"..असं म्हणून मी त्याच्याकडून दुसरा सिजन घेतला. नाहीतरी मी पिक्चर बघत होतोच. मी तो दुसरा सिजन पहिला, आणि मग झपाटल्यासारखा friends addict झालो. खरं तर friends पाहणं माझ्यासाठी एखाद्या treatment सारखं झालं. पुन्हा fresh वाटू लागलं. मी किरण आणि काही मित्र - (विजयदा, धीरज) बरोबरच friends पाहत होतो. किरण सुरुवातीला माझ्या पुढं होता, नंतर आम्ही सिजन टू सिजन बरोबर आलो. मग एपिसोड्स पहायचे आणि त्याबद्दल रोज गप्पा व्हायच्या. friends ने व्यापलेले दिवस होते ते.


Friends ची सुरुवात सेंट्रल पार्क या कॅफे मध्ये होते. पाच मित्र - रॉस, मोनिका, जोई, फिबी आणि चांडलर कॅफेमधील सोफ्यावर बसून चेष्टा मस्करी करत बसले आहेत. तेवढ्यात तिथं पांढराशुभ्र वेडिंग ड्रेस घातलेली रॅचेल येते. ती तिच्याच लग्नातून पळून आलेली असते. मोनिकाची ती बालमैत्रीण असल्यानं ती तिच्याकडं राहायला येते आणि यांच्यातलीच एक होऊन जाते. तिथून पुढची गोष्ट या सहजणांच्या रोजच्या जगण्यातल्या विसंगती, त्यातून निर्माण होत जाणारे विनोद याची आहे. या सगळ्यांसोबतच निर्जीव पण महत्वाची पात्रं आहेत त्यांचा अड्डा-सेंट्रल पार्क आणि एका बिल्डिंगमधील समोरासमोरच्या दोन अपार्टमेंट्स (आपल्या भाषेत फ्लॅट्स). त्यांच्यातल्या प्रत्येकाच्या काही अडचणी आहेत, स्वभाव विशेष आहेत, त्यातून काही किस्से घडत जातात, एखाद्याची फजिती होते, मग त्याची सगळे चेष्टा करतात. पण जेव्हा कुणी खचेलेलं असतं, निराश होतं तेव्हा मात्र "I'll be there for you" म्हणत सगळे त्याला आधार देतात. एखाद्या पात्राचा एखादा पैलू, एखादा प्रसंग आपण रिलेट करू लागतो, जेव्हा त्यांच्यात काही विनोद होतो तेव्हा त्यांच्यासोबत आपणही हसू लागतो. एखाद्या भावनिक प्रसंगात आपल्याही डोळ्यात पाणी येतं, पण ही लोकं तुम्हाला रडवत मात्र अजिबात नाहीत. एकेक एपिसोड पाहत तुम्ही कधी त्यांच्यातलाच एक होता ते समजत नाही. 


Friends बघताना नकळत तात्कालिक अमेरिकेतल्या समाजाबद्दलही काही गोष्टी समजतात. एका वयानंतर मुलांनी स्वतःच्या पायावर उभ राहणं, आपला मार्ग निवडणं. एकमेकांच्या वैयक्तिक अवकाशाला असलेलं महत्व. पॉप कल्चरचे संदर्भ. Casual नात्यानंतर कमिटमेंट आणि त्यानंतर लग्न. घटस्फोटांचं प्रमाण, पालकांच्या घटस्फोटाचे मुलांवरील परिणाम वैगेरे.

तसंच फ्रेंड्स मधून समलैंगिकता, दत्तक मूल, सरोगेट आई, एकल पालकत्व असे विषय खूप अलगद हाताळले आहेत. या सगळ्यांच्या चांगल्या वाईटबद्दल चर्चा करण्याचा काही हेतू नाहीय, आणि मालिकेमध्येही हे संदर्भ नकळत येतात, त्यावर काही गंभीर भाष्य अजिबात होत नाही. पण" आहे हे असं आहे" हे दाखवलं जातं. 


Friends बद्दल टोकाची मतंही आहेत. त्यात वारंवार येणाऱ्या casual नात्यांबद्दल, लैंगिकतेच्या संदर्भांवरून त्यावर टीका होते. Friends overrated आहे, त्यात बऱ्याच चुका आहेत, त्यात काहीच विनोदी नाही, त्यापेक्षा अनेक sitcom कितीतरी पटीने चांगल्या आहेत, पात्रं उथळ दाखवली आहेत, उगाचच friends चा उदोउदो केला जातो, त्यात मैत्रीऐवजी नात्यांबद्दलच जास्त दाखवलं आहे, विनोदी मालिका असताना उगाच गंभीर विषय घातले आहेत इत्यादी इत्यादी. एखाद्याला friends अजिबात आवडू शकणार नाही किंवा एखाद्याला ती पुन्हा पुन्हा पाहू वाटेल. आवड ही गोष्ट मुळात वस्तुनिष्ठ नाही. काही लोकांना south चे सिनेमे अजिबात आवडत नाहीत, काही लोकांना अनुराग कश्यपचे सिनेमे आवडत नाहीत, काही लोकांना लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ यांचे सिनेमे आवडत नाहीत त्यात त्यांना विनोद दिसत नाही तर काही लोकांना dark comedy सिनेमांमधील विनोद समजत नाही. याचा अर्थ असा अजिबात होत नाही की कुठलातरी एकच गट योग्य आहे आणि दुसरा अयोग्य. भिन्न मतं असू शकतात, असायला हवीत. चर्चाही व्हायला हव्यात पण हीच गोष्ट योग्य बाकी सगळं अयोग्य अशी मानसिकता चर्चेची शक्यताच संपवून टाकते.


असो, वैयक्तिक माझ्यासाठी friends खूप जवळची आहे. मी पहिल्यांदा पाहत असताना जेव्हा एक-दोन सिजन शिल्लक राहिले तेव्हा वाटायला लागलं की आता हे सिजन हळूहळू पाहावेत, पुरवून पुरवून. कारण जर सगळे सिजन संपले तर पुढं काय? सिरीयल संपूच नये असं वाटत होतं. शेवटच्या सिजनच्या शेवटचा एपिसोड पाहणं अवघड होतं. शेवटच्या भागाच्या शेवटी सगळे मोनिकाची अपार्टमेंट सोडून जातात आणि दार बंद करतात. कॅमेरा त्या रिकाम्या अपार्टमेंटमधून फिरत दाराच्या peephole वर फोकस होतो आणि मालिका संपते. त्या शेवटच्या सीनमध्ये दाखवलेल्या मोनिकाची रिकाम्या अपार्टमेंटसारखी मनाची अवस्था होते, राहते पुढचे काही दिवस, काहीतरी हरवून गेल्यासारखी. 


आज friends सुरू झाली त्याला २५ वर्षं झाली, friends २२ सप्टेंबर १९९४ ला सुरू झाली, तेव्हा मी चार वर्षांचा होतो. 

त्यावेळी कुणी सांगितलं नव्हतं की, तुम्ही जसा विचार करता तसं आयुष्यात घडत नाही, अनेक अनपेक्षित गोष्टी घडत जातात. लहानपणी गोष्टी जेवढ्या सोप्या आणि सरळ वाटतात तश्या त्या घडत नाहीत. 


"So no one told you that life was gonna be this way..."

"Your job's a joke,

You're broke,

Your love life's DOA"


जेव्हा आयुष्यात काहीच नवं घडत नाही किंवा

आपल्या मनाप्रमाणे काही घडत नाही, 

वेळ खराब चाललेली असते,


"Its like you're always stuck in second gear,

When it hasn't been your day, your week, your month,

or even your year"


तेव्हा आपले मित्रच असतात आणि ते म्हणतात की

" मै हूं ना यार"

मित्राचं हे वाक्यच या सिरीयलचं title song आहे,


"I'll be there for you,

When the rain starts to pour,

I'll be there for you,

Like I've been there before,

Cuz you're there for me too....."


आणि या गाण्यातल्या प्रत्येक शब्दांप्रमाणं सिरियलमधले सगळे जोई, मोनिका, चांडलर, फिबी, रॅचेल, रॉस सगळे एकमेकांसाठी असतात, आणि ही सिरीयल आपल्यासाठी असते "I'll be there for you" म्हणत.


आजही कधी कधी तशी अवस्था येते, निराशा किंवा अस्वस्थतेची, काही दिवस टिकणारी. अशा वेळी मी परत एकदा friends चे काही episode पाहतो, यादृच्छीकपणे, कुठलेही, मनाचं रिफ्रेश बटन आहे ते !


- अभिजित कदम.