Friday, 15 December 2017

#kiff दुसरा दिवस : ३ चित्रपट आणि राजदत्तजी.

#kiff2017

● Day 2

#KolhapurInternationalFilmFestival2017

शाहू स्मारकला एक सभागृह आहे,  १ कलादालन आणि २ हॉल आहेत. स्मारक, कलादालन आणि एक हॉल खाली तर दुसरा हॉल वरच्या मजल्यावर आहे. कलादालनात बाबुराव पेंटारांच्या चित्रपटातील छायाचित्रांचे प्रदर्शन आहे.

 सभागृह, खालचा हॉल आणि वरचा हॉल अशा ३ स्क्रीन्स आहेत.

स्मारकात येताना गेटवर kiff चा चौकटी बोर्ड आहे,  सभागृहाच्या बाहेरच्या जागेचा चांगला वापर करून सभागृहात जाण्यासाठी एन्ट्री तयार केली आहे. त्या एन्ट्रीच्या वर खूप छान लिहिलंय

"Enlighten your world"



हे वाचून उगाच लय भारी वाटतं 😃.

* * *

हे झालं बाहेरच्या वतावरणाबद्दल. उद्या याबद्दल आणखी सांगेन. आता मुख्य विषय. आज ३ चित्रपट पाहिले :

( चित्रपटांबद्दल जे लिहिलंय ते परीक्षण तर अजिबातच नाही,  प्रत्येकजण चित्रपटाबद्दल असाच विचार करेल असंही नाही. ही माझी वैयक्तिक मतं आहेत आणि मला ज्या चित्रपटाबद्दल लिहावंसं वाटलं त्याबद्दलच लिहिलंय. )

1. सर्वनाम,२०१७ (मराठी : गिरीश मोहिते) : मायमराठी कॉम्पिटिशन.

2. The Prophecy 2015 (Vietnam : Vuyong duc) : segment-CC-COUNTRY FOCUS.

3. The House of the 41st street 2017 (Iran : हमीद घोरबानी) : segment - World Cinema.

★ सर्वनाम
गूढत्वामार्गे अध्यात्मिक विषयाकडे जाणारा होता. मंगेश देसाईचा अभिनय खूप आवडला. कथा चांगली होती. फक्त एक पात्र कृत्रिम वाटलं, त्याचे संवाद कृत्रिम वाटले. जास्त काही लिहावंसं वाटल नाही.

■ सर्वनाम पाहून बाहेर पडताना "सर्जा", "अरे संसार संसार", "भालु","मुंबईचा फौजदार", "माफीचा साक्षीदार" ,"माझं घर माझा संसार" इ. मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक राजदत्तजी बाहेर पडताना दिसले. (शांतपणे चित्रपट पाहता यावा म्हणून मी सुरुवातीच्या तिसऱ्या row ला बसलो होतो. बऱ्यापैकी सगळे माग बसले होते.म्हणून बाहेर पडताना मी शेवटी राहिलो आणि राजदत्तजी दिसले !). कुणी ओळखलं नसावं त्यांना. एकटेच गर्दीच्या मागून बाहेर चालले होते. त्यांना फोटो काढू का विचारलं. खूप छान हसले आणि हो म्हणाले. मग सेल्फी काढला.

मग ते पुढं गेले. मी तेवढ्यात सॅकमधून डायरी काढली. त्यांच्या जवळ गेलो त्यांनी माझ्याकडं पाहिलं. मी डायडी समोर केली. पुन्हा छान हसले आणि सही दिली.




★ The Prophecy
व्हिएतनामच्या फ्रांसविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्याची कथा आहे आणि mostly हा "हो ची मिन्ह" यांचा चरित्रपट होता.
व्हिएतनामच्या घनदाट जंगलातुन प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दिलेल्या लढ्याची कथा. जवळजवळ संपूर्ण चित्रपट या जंगलातच शूट केलाय. चित्रपटात मला एकंदरीत patriotic फीलिंग जाणवली.

एक quote आणि एक संवादाबद्दल लिहावंसं वाटतं.

हो ची मिन्ह सहकाऱ्यांबरच्या बैठकीत माओ झेडांगच एक वाक्य बोलतात "Politics is a war without blood and war is politics with blood"

एका प्रसंगात एक पत्रकार जंगलात हो ची मिन्ह यांची मुलाखत घ्यायला येतो. तो विचारतो "तुम्ही communist आहात की nationalist ?"
मिन्ह शांत असतात. उभे राहुन क्षणभर शांतच राहतात. पत्रकार पुन्हा विचारतो, "तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही..."
तेव्हा ते उत्तरतात, "या प्रश्नाचं उत्तर खूप मोठंही आहे आणि खूप लहानही. मी लहान उत्तर देतो. मी patriot आहे."

एकंदरीत चांगला चरित्रपट वाटला मला.

★ The House of the 41st street
आज सगळ्यात जास्त आवडलेला चित्रपट. इराणमधील एका शहरातल्या 41st स्ट्रीट वरच्या एका घरातली कथा.

सुरुवातीला एक दुकान दिसतं, मग तिथं दोघांजणात हिश्श्यावरून आणि कर्जावरून भांडण सुरू होतं. या शॉटला समांतर शॉटमध्ये एक वयस्कर बाई रस्त्यावरून घाईत पळताना दिसते. ते दोघे (मोहसीन आणि मॉर्तेझा नावाचे भाऊ असतात ) सुरुवातीला भांडत असतात, मग दोघेही हायपर झालेले दिसतात, मग एकमेकाला ढकलाढकलीत दोघे फ्रेममध्ये डावीकडे अंधारात जातात.
Cut to :  ती वयस्कर बाई आता त्या दुकानाबाहेर आलीय. बाहेर पोलीस आहेत, गर्दी झालीय, लोक काय चाललंय ते बघताहेत. ती त्या दोघांची आई आहे म्हटल्यावर पोलीस तिला आत सोडतात. मग दुसरी एक बाई , एक माणूस आणि एक मुलगा येतात. त्या भांडणात मॉर्तेझाचा मोहसीनच्या हातून खून होतो आणि मोहसीन पळून जातो. ती दुसरी  बाई मॉर्तेझाची पत्नी फॉरेघा असते, तो माणूस फॉरेघाचा भाऊ आणि तो मुलगा मॉर्तेझ-फॉरेघाचा मुलगा असतो.

भांडणात मोहसीनकडून मॉर्तेझाच्या खुनानंतर सगळं बदलतं. 41st street वरील त्या तीन मजली इमारतीत खालच्या मजल्यावर दोघा भावांची वयस्कर आई राहत असते. मध्ये मोहसीनची बायको हमीदा आणि गोड मुलगी सनम राहत असतात, तर सगळ्यात वर आता फक्त मॉर्तेझाची बायको फोरोघ आणि १२ वर्षांचा मुलगा(नाव आठवत नाहीय) राहत असतात.

मुलाला महितेय की त्याच्या चुलत्याने त्याच्या वडिलांचा खून केलाय, त्यामुळं तो खूप बदललाय. तो त्याच्या लहान चुलत बहिणीशी, सनमशी आता पहिल्यासारखा बोलत नाही. त्यामुळं ती निरागसपणे आईला विचारते तो माझ्याशी का नाही बोलत?मी बाबांशी कट्टी केली तर बोलेल का तो माझ्याशी? तिच्या आईला तिच्या टॅब्लेटमध्ये गेम्स अपलोड करता येत नाहीत, ती त्याच्याकडं जाते पण तो गेम्स देत नाही. तिची आई टॅबलेट गेम्स शिकायचा प्रयत्न करते, तेव्हा सनम आईला म्हणते तुला दादासारखी (नाव आठवत नाही म्हणून दादा) नाही जमत गेम.

इराणी कायद्यानुसार मोहसीनला शिक्षा देण्यात मॉर्तेझाच्या पत्नीच्या मताचा काहीच विचार होत नाही. एकतर त्या दोघांची वयस्कर आई मोहसीनला फाशी द्यावी असं सांगू शकते किंवा मॉर्तेझाचा मुलगा legal age ला आल्यावर (आणखी दोन वर्षांनी) एकतर चुलते मोहसीनला शिक्षा देण्याबद्दल सांगू शकतो किंवा blood money (भुर्दंड) मागून चुलत्याची शिक्षा रद्द करू शकतो.

एका सीनमध्ये दोन भावांची आई दोन्ही मुलांच्या बायकांना एकत्र बोलावते, मोहसीनबद्दल काय निर्णय घ्यायचा विचारायला. फिरोघा नवरा मेल्याचं दुःख आहे,तिचा मुलगा अनाथ झाला आहे त्यामुळे मोहसीनला शिक्षाच झाली पाहिजे असं सांगते. तर हमीदा लहान मुलीला आताच शाळेत खुन्याची मुलगी म्हणून हिनवल जातंय, ती आताच वडिलांबद्दल वाईट विचार करतेय, तिला आयुष्यभर याच दुःखात नाही मोठं करायचं अस सांगते आणि तिचं दुःख मोठं असल्याचं सांगते. तेव्हा ती म्हातारी म्हणते " मला तर दोन्हीही दुःख आहेत, मुलगा मेल्याचं आणि दुसऱ्या मुलाला होणाऱ्या शिक्षेचंही." [ अंगावर काटा येतो ऐकून.]
मग म्हातारी निर्णय मॉर्तेझाच्या मुलावर सोपवते, आणखी दोन वर्षांनी तोच ठरवेल अस म्हणते.

मोहसीनला खूप पश्चाताप झालेला असतो, होत असतो , आईच्या सांगण्यावरून तो पोलिसात हजर होतो, हमीदा त्याला जामिनावर सोडवते. तो भाड्याच्या खोलीत दुसरीकडं राहतो. त्याला भावाच्या मुलाला भेटावं वाटत, खूप पश्चाताप होत असतो, पण मॉर्तेझाच्या मुलाला त्याला भेटायची इच्छा नसते आणि त्याच्या चुलत्याला जामीन मिळाल्याचं त्याला कुणी सांगतही नाही.

शेवटच्या सीनमध्ये मॉर्तेझाचा मुलगा आईबरोबर ते घर सोडून दुसरीकडं राहायला जाण्यासाठी गाडीत साहित्य शिफ्ट करत असतात. तेव्हा न राहवून मोहसिन तिथं येतो आणि त्यांना घर सोडून जाऊ देत नाही. मॉर्तेझाच्या मुलाला चुलता आल्याच दिसल्यावर त्याचा तोल जातो तो खूप आक्रदंत चुलत्याला लहान हातांनी मारत राहतो. चुलता त्याला मिठी मारत शांत करण्याचा प्रयत्न करत राहतो. [त्याचा तो आक्रोश खूप टोचतो पाहताना.  डोळ्यातून पाणी येत. ] कॅमेरा त्या दोघांवरून माग येतो, घराच्या बाहेर बॅग्ज वरून त्या तीनमजली घरावर अन मग बाहेर येतो, गेट दिसतं, तिथून कंपाउंडच्या भिंतीवरुन उजवीकड जात राहतो आणि "41st street" या पाटीवर येऊन थांबतो. Still frame.

नावं पडतात.

सभागृहातली (पहिली स्क्रीन) लाइट लागते. सभागृहात मोजकेच असणाऱ्यातले काही लोक लाईट लागली आणि नावं पडू लागली तरी जरावेळ त्या आक्रोशातच गुंतलेले बसून असतात. मग मी बाहेर येतो. त्याच स्क्रीनला वेगळ्या ठिकाणी बसलेल्या मित्रांना भेटतो. पाचेक मिनीटं त्या चित्रपटाबद्दल बोलतो आणि निघतो. डोक्यात तसाच चित्रपट साचलेला....व्यक्त होण्यासाठी आतुर.

मी घरी यायला निघतो. बाहेर एक वाक्य दिसतं.

" The sad moment when you return to your boring and ordinary life after watching an awesome movie "


-अभिजीत कदम.

Thursday, 14 December 2017

#kiff2017 दिवस पहिला : १४ डिसेंबर २०१७ : उद्घाटन, Opening Film : Northless (Mexico)

#kiff2017

● ६ वा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१७ ●



दिवस पहिला : १४ डिसेंबर २०१७.

(Opening show मेक्सिकन चित्रपट "northless" हा मेक्सिकोतून USA ला अवैधरित्या जाणाऱ्या Andress बद्दलचा जरासा सिरीयस ह्युमरस चित्रपट होता, त्याबद्दल लिहून लिंक नंतर शेअर करेन)

सहाव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी "परदेस", "हिरो" , "राम - लखन" "कर्मा", "सौदागर" "ताल" इ. चित्रपटांचे दिग्दर्शक सुभाष घई प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. यावर्षीचा भालजी पेंढारकर पुरस्कार " दोघी ", " देवराई ", "वास्तुपुरुष", "एक कप च्या", "नितळ" , " संहिता","अस्तू", "कासव" चित्रपटांच्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना मिळाला.

पहिल्यांदा सुमित्रा भावे सभागृहात आल्या आणि पुढं बसल्या. बहुधा कुणाच्या लक्षात आलं नाही. कारण एकतर त्यांचे सिनेमे जास्ती थेटरात लागत वैगेरे नाहीत, अस्तू च्या प्रदर्शनासाठी तर त्यांना वर्गणी जमा करावी लागली होती. आणि जरी चुकून कुणी थेटरात जाऊन पहिलाच (दुसरा ऑप्शन नसल्याने) तर खूपच संथ असल्यामुळे परत कधी त्या वाटेला गेलेला नसणार. बहुतेक यामुळे त्यांचं येणं कुणाच्या लक्षात आलं नाही.

नंतर सुभाष घई आले. सभागृहातील बहुतांशजण उभे राहून टाळ्या वाजवू लागले. मग फोटो घेतले गेले. त्यांनी प्रेक्षकांकडं पाहून हात केला आणि बसले.

नंतर औपचारिकता झाली.

सुभाष घई बोलायला उठले.
त्यांनी आजचं डिजिटल जनरेशन जुन्या जनरेशनच्या अनेकपटीन पुढं कसं आहे आणि ते स्वतः कसे जिवंत इतिहास झाले आहेत हे सांगितलं.
त्यांनी कोल्हापूरचा चित्रपट महोत्सव मोठा करण्यासाठी इथल्या लोकांनीच कसे प्रयत्न केले पाहिजेत हे युरोपातल्या फेस्टिव्हल्सचे चे दाखले देऊन सांगितलं. तसेच सरकारने मदत केली पाहिजे असं सांगितलं. नंतर त्यांनी चित्रपट हे फक्त मनोरंजन नसून जागरण/enlightenment असल्याचं सांगून त्यांनी सामाजिक इत्यादी संदेश पिक्चरच्या माध्यमातून कसे दिले ते (गीतेची शिकवण गोष्टीरूपातून त्यांना कशी समजली याचा दाखला देऊन) सांगितलं. त्यांनी त्यांचा चित्रपटातून भावंडांमधील नातं, पोलीस-गुन्हेगार, प्रेम इ. विषय कसे मांडले व ते व्यक्तिविकासासाठी कसे आवश्यक होतं ते सांगितलं.

सुमित्रा भावेंना पुरस्कार दिला.

त्या बोलायला उठल्या.
आवाज वयामुळं जरा कापत असला तरी खंबीर होता. त्यांनी पुरस्काराचा त्यांचे जवळजवळ सगळ्याच चित्रपटातील दिगदर्शक सुनील सुकथनकर, त्यांचे पाहिले छायाचित्रणकार आणि त्यांचे सहकारी यांच्या वतीने स्वीकार केला. त्यांनी राज्यशास्त्र, समाजशास्त्र यांच्या पदव्युत्तर पदव्या घेतल्यानंतर ग्रामीण महिलांच्या प्रश्नांचा अभ्यास करताना "बाई" हा लघुपट केल्याचं सांगितलं. त्यांचे सगळे चित्रपट सहसा तारे तारका नसणारे व खऱ्या माणसांबद्दल असल्याचे सांगितले. कासवसारखा चित्रपट त्या बनवत असताना हिंसा अनिवार्य असणाऱ्या चित्रपटांच्या वाढत्या संख्येबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

बहुतांश कार्यक्रम सुभाष घई यांच्यावर केंद्रित होता. सुभाष घईंना शोमन बोललं जातं, कार्यक्रमातही दोनदा उल्लेख झाला. त्यांचे दिगदर्शीत व्यावसायिक चित्रपट खूप चांगले होते, मला अजून आवडतात. नोस्टॉजिक होतो अजूनही बघताना.

सुमित्रा भावे कार्यक्रमात सुरुवातीला लोकांच्या नजरेत आल्या नाहीत, कार्यक्रम झाल्यावर फोटो/सेल्फीज घेतले गेले. त्यांचे "एक कप च्या","नितळ","देवराई", "अस्तू","कासव" पाहिले आहेत. राहिलेले अजून पहायचेत. विचारांची साखळी अभिक्रिया निर्माण होते पाहिल्यावर, डोक्यातून जात नाहीत. आणखी एकदा पाहिल्यावर आणखी नवा पैलू उलगडतो. कासव मी पहिल्यांदा वेगळा इंटरप्रेट केला होता, नंतर त्याच्यावरचे लेख, सुनील सुकथनकारांची मुलाखत वाचल्यावर(किंवा मुलाखत youtube वर पहिली होती, नीटसं आठवत नाही) नव्या दृष्टीनं त्याचं interpretation झालं. अस्तु दोनदा पहिला, नितळ दोनदा पहिला.

सुभाष घईंचे सिनेमे मनोरंजन आणि नोस्टॉजिया म्हणून आवडतात.
सुमित्रा भावेंचे सिनेमे वेगळा दृष्टिकोन देणारे, विचारप्रक्रिया सुरू करणारे म्हणून नुसते आवडते नाहीत तर समृद्ध करणारे आहेत. म्हणून माझ्यासाठी तरी सुमित्रा भावे या कलाकार , दिग्दर्शक म्हणून नेहमीच मोठ्या आहेत. बऱ्याचदा टाळ्या मिळवणाऱ्या व्यक्तीसमोर विचार असणारी व्यक्ती लहान दाखवली जाते. तेव्हा विचार असणारी व्यक्ती "हॉवर्ड रोर्क" सारखी अविचल, स्थितप्रज्ञच राहते...

मला मात्र उगच वाईट वाटत राहतं.

- अभिजीत कदम.