नोलनचा "ओडिसी" अनेक कारणांनी आतापर्यंत सांगितलेल्या / दाखविलेल्या "ओडिसी" पेक्षा वेगळा आहे. ओडिसीची कथा ही फक्त ग्रँड स्केलवर लोकांना अचंबित करण्यासाठी किंवा त्यातील अद्भुतरस, वीररस IMAX सारख्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावा, केवळ हा हेतू ठेवून दाखवलेली नाही. तसं करणं त्याला अजिबात अवघडही नव्हतं, असा भाव्यपणा अर्थात त्याच्यापेक्षा आणखी कोण चांगल्या प्रकारे दाखवू शकतं!! पण प्रेक्षक जाणीवपूर्वक "ओडिसी"कडे एका गेल्या परिप्रेक्षातून कसे बघतील याची काळजी नोलन मुख्यतः दृश्य, त्यानंतर पार्श्वसंगीत आणि मग अभिनय यांच्या माध्यमातून घेतो. आताच्या लेखनाचा उद्देश माझ्या ओडिसी पाहण्याच्या संपूर्ण अनुभवाबद्दल नसून त्या अनुभवाच्या काही तुकड्यांबद्दल आहे.
सिनेमा हे प्रथमतः दृश्य माध्यम आहे. सिनेमा हा शब्दच मुळात "kinema" या ग्रीक शब्दापासून जन्माला आहे. "Kinema" म्हणजे हालचाल. (याच मूळ धातूपासून "kinetic" म्हणजे गतीज हा शब्द तयार झाला आहे.). सिनेमाला आपण "चित्र"पट म्हणतो, कारण हलणारी दृश्य हे सिनेमा या माध्यमाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. नाटक हे जसे अभिनेत्याचे माध्यम आहे, पुस्तक हे लेखकाचे माध्यम आहे, तसे सिनेमा हे मूलतः दिग्दर्शकाचे माध्यम आहे. त्यामुळे पडद्यावर एखादी गोष्ट एकप्रकारे दिसत असेल तर ती गोष्ट प्रेक्षकाने तशी पहावी असा दिग्दर्शकाचा हेतू असतो. दिग्दर्शकाची ती सृजनशील निवड (creative choice) असते. नोलनच्या अशा काही निवडींबद्दल मला आज सांगायचं आहे.
इलियड आणि ओडिसी या दोन्ही महाकाव्यांमधील सगळ्यात नाट्यमय, कलाटणी देणारा, दोन्ही कथानके सांधणारा आणि एका महत्त्वाच्या बिंदूपर्यंत नेणारा प्रसंग म्हणजे ट्रॉयच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन पडलेली ग्रीकांची भेट आलेला मोठा लाकडी घोडा. जवळपास दहा वर्षं ट्रॉयच्या बाहेरच थांबलेलं ग्रीक सैन्य या "ट्रोजनच्या घोड्यातून" (Trojan Horse) ट्रॉयमध्ये प्रवेश करतं. ही लाकडी घोड्याचा कल्पना सुचते "इलियड" मधील दुय्यम पात्र आणि "ओडिसी" मधील मुख्य पात्र असणाऱ्या ओडिसियसला. तो ट्रोजनचा घोडा ट्रॉयच्या तटबंदीमधून आत घेतला जातो आणि त्यानंतर ग्रीकांना बहुप्रतिक्षित विजय मिळतो.
हा प्रसंग खरं तर इलियडचा भाग आहे. "ओडिसी"मध्ये फक्त ओडिसियसचा घराकडे असणारा प्रवास आणि त्या प्रवासातील अद्भुत प्रसंग आहेत. पण नोलन जाणीवपूर्वक ट्रोजन घोडा ट्रॉयमध्ये घुसण्याच्या प्रसंगाला अतिशय महत्त्व देतो. तो प्रसंग पार्श्वसंगीताच्या अतिशय परिणामकारक वापरातून नोलनने खूपच प्रभावीपणे पडद्यावर रंगवत नेला आहे, build करत नेला आहे. अस्सल नोलन शैलीतील अतिशय सुंदर visual treat आहे ती. Interstellar मध्ये "Docking Scene" मध्ये जशी वातावरण निर्मिती साधली आहे, तश्या प्रकारचा परिणाम साधण्याचा प्रयत्न नोलन इथे करतो. इथं घोडा कसा दाखवावा ही पूर्णतः दिग्दर्शकीय निवड आहे. जुन्या इलियड - ओडिसी च्या रूपांतरामध्ये, चित्रपटांमध्ये ट्रोजन घोडा हा चारी पायांवर उभा असलेला दाखवलेला आहे. नोलन मात्र पुढच्या दोन्ही पायांवर उभा असलेला घोडा दाखवतो. IMAX सारख्या मोठ्या स्क्रीनवर, समुद्रकिनाऱ्यावर असलेला स्क्रीन व्यापून टाकणारा आक्रमक अवस्थेतील भव्य घोडा आणि पार्श्वभूमीवर हळूहळू लय पकडणारं संगीत एक वेगळाच परिणाम साधतं. तो परिणाम केवळ अनुभवावा. एक तर त्यातील काही फ्रेमच इतक्या सुंदर आहेत, जणू काही सुंदर paintings आपण पाहत आहोत, फ्रेमची रचना, प्रकाश - छाया, रंग!! आणि मग अर्थात तो घोडा आत जाऊन, त्यातून सैनिक बाहेर येऊन, आतून अजिंक्य दरवाजा उघडून ट्रॉयचा पाडाव होण्याला सुरुवात होईपर्यंत हळूहळू वातावरण निर्मिती करत जाणारं पार्श्वसंगीत! चित्रपटाच्या पहिल्या भागात नोलन या प्रसंगातील अर्धाच भाग दाखवतो, दार उघडून ॲगमेनॉन सैन्यासह आत येऊन ट्रॉयचा पाडाव करायला सुरूवात होईपर्यंत. आणि मग चित्रपटभर अनेक वेळा एकच दृश्य बऱ्याचदा दाखवलेलं दिसतं. ओडिसियस त्या युद्धातील एका क्षणी पायऱ्यांवर हतबलपणे बसून उजवीकडे वरती काहीतरी पाहत बसलेला दाखवला जातो. त्याच्या चेहऱ्यावर असणारा पश्चाताप फ्रेममधून झिरपत असतो. नोलन मुद्दाम ३ ते ४ वेळा हीच फ्रेम वेगवेगळ्या वेळी पुन्हा पुन्हा का दाखवतो ते पडद्यावरच अनुभवलं पाहिजे.
ट्रोजन घोडा, विश्वासघाताचं प्रतीक. दहा वर्ष ग्रीकांना ट्रॉय जिंकता येत नाही, अतिशय भक्कम तटबंदी असते ट्रॉयची. दहा वर्षांनी ग्रीकांच सैन्य निघून जातं आणि समुद्रावर ट्रॉयला ग्रीकांनी दिलेली भेटवस्तू - लाकडी घोडा येतो. आपले देव सारखेच आहेत, असं म्हणून ट्रॉय ती भेट स्वीकार करतं, आणि तो घोडा आत घेतं. युद्धाचे नियम पाळून ग्रीकांना ट्रॉय कधीच जिंकता आलं नसतं. म्हणून ते विश्र्वासघातकी योजना आखतात. देवांच्या पवित्रपणावर विश्वास ठेऊन ट्रॉय तो घोडा आत घेतं. आपला विजय तर ग्रीक गेल्यावर झालाच आहे यामुळं गहाळ पडलेलं, अभेद्य अजिंक्य ट्रॉय! आणि मग सगळे झोपलेले असताना रात्री त्या घोड्यातून ग्रीक सैनिक बाहेर पडून पाताळयंत्री पद्धतीने (ग्रीकांच्या दृष्टीने चलाखी) बेसावध असलेल्या ट्रॉयवर तुटून पडतात. प्रचंड हिंसाचार होतो.त्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नोलनच्या ओडिसीमधील ओडिसियसचा उद्विग्न पश्चातापदग्ध आवाज आपल्या ऐकू येतो..."आणि दहा वर्षं युद्धाच्या प्रतीक्षेत असणारं आमचं सैन्य मग ट्रॉयवर तुटून पडलं. दहा वर्षांचा राग भडकून त्याने ट्रायला जाळून टाकलं.."(स्वैर अनुवाद). जेव्हा ओडिसियस हे सांगत असतो तेव्हा माणसाच्या आत असणाऱ्या प्राण्याबद्दल, त्याच्या आदिम प्रेरणांबद्दल नोलन आपल्याला काही सांगत असतो. अशावेळी "निशांत" मध्ये शेवटी सत्यदेव दुबेंच्या पात्राच्या दृष्टिकोनातून, माणसातील बाहेर आलेलं जनावर दाखवणारे तेंडुलकर - निहलानी आणि ओडिसीमध्ये ट्रॉयमधील विध्वंस दाखवणारा नोलन माझ्यातील माणसाला एकाच प्रकारे हलवून सोडतात, मला भवतालाबद्दल अधिक संवेदनशील बनवतात. ट्रॉयचा विजय "ट्रॉय" चित्रपटात आपण पाहतो तेव्हा त्यात विररस असतो, परंतु नोलनच्या "ओडिसी"मध्ये आपण तोच विजय पाहताना मात्र त्यात रौद्ररस करुणरसात रूपांतरित होताना आपण पाहतो. "ओडिसी" पाहताना आपल्याला युद्धज्वर चढत नाही, युद्धाची भयानकता दिसू लागते
ट्रोजन घोडा. याच ट्रोजन घोड्यावरून कॉम्प्युटर हॅक करणाऱ्या एका व्हायरसचं नाव "ट्रोजन व्हायरस" असं पडलं. आपण एखादी लक्षवेधक फाईल (एखादं ऍप, एखादी गेम, एखादा चित्रपट) आपल्या कॉम्प्युटरमध्ये (तथा मोबाईलमध्ये) विश्वासाने डाउनलोड करतो. उत्सुकतेने ती फाईल उघडतो, आणि उघडल्यावर कळतं की हा तर व्हायरस होता!! आणि आपणाला काही कळायच्या आत आपला कॉम्प्युटर / फोन बाधित होतो. आपणच "वरलीया रंगा" भुलून जाऊन, वरच्या रूपावर विश्वास ठेऊन ती फाईल आपल्या कॉम्प्युटरवर घेतो. त्या फाईलचा, ट्रोजन घोड्याचा मूळ उद्देश वेगळाच असतो. ती भेटवस्तू नाही तर आपला संगणक, आपलं राज्य उद्ध्वस्त करणारं कुटिल कारस्थान आहे हे आपल्याला तेव्हा समजतं, जेव्हा आपण त्याला विश्वासाने आपल्या जवळ केलेलं असतं. त्यानंतर मात्र लक्षात येऊन काही उपयोग होत नाही. आपल्यासाठी विश्वासघात असला तरी घोड्याची रचना कारणा-यासाठी मात्र तो "मास्टरस्ट्रोक" असतो. हे सगळं जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा सगळं होत्याचं नव्हतं झालेलं असतं. चूक आपलीच असते, आपणच भाबडेपणांनं ती फाईल आपल्या संगणकामध्ये डाउनलोड केलेली असते, आपल्या जवळ स्थान दिलेल असतं. चूक ट्रॉयची असते, ते घोड्याला निरुपद्रवी भेटवस्तू समजून त्याचा नुसता स्वीकार करत नाहीत तर त्याला अभेद्य तटबंदीच्या आत घेतात. त्या घोड्याचं खरं स्वरूप समजून येईपर्यंत मात्र वेळ कायमची निघून गेलेली असते. घोडा निमित्तमात्र राहतो, त्याच्यात मूलतः काहीच शक्ती नसते, त्याचा वापर होऊन तो बाजूला फेकून दिला जातो. असो!
नोलनच्या ओडिसीमध्ये : ओडिसियसला आपण ट्रोजन घोडा तयार करून चूक केली हे लक्षात येऊन खूप पश्चाताप होतो. ग्रीक सैन्य आत आल्यावर बेभान होऊन अंधाधुंदपणे विध्वंस करत सुटतं. बुद्धी आणि तर्कशुद्ध विचारांचे प्रतीक असणाऱ्या अथेनाच्या भव्य पुतळ्याचा शिरच्छेद सैनिक करतात आणि अथेनाच्या पुतळ्याचं तुटलेलं शीर "आपण काय करून बसलो" या पश्चातापदग्ध मनस्थितीत बसलेल्या ओडिसियससमोर येऊन पडतं. या प्रसंगातच आणखी दोन समांतर दृश्यं चित्रपटात दाखवली आहेत, पण ती पडद्यावरच पाहिली पाहिजेत. सद्सद्विवेकाचे प्रतीक असलेल्या त्या तुटलेल्या शिराकडे पाहत असताना ओडिसियसच्या मनात एक द्वंद्व सुरू होतं. एक अतिशय पवित्र गोष्ट आपण आज मारून टाकली अशी भावना त्याला छळू लागते. त्याचा विवेक त्याला डागण्या देऊ लागतो. कदाचित त्यामुळे तो ॲगमेनॉनच्या सोबत घरी न जाता वेगळ्या मार्गाने घरी जातो. इथे दोन प्रवास आहेत, आणि दोन संघर्ष आहेत. एक आहे ओडिसिएसचा समुद्रातील प्रवास आणि संघर्ष , जिथे तो खवळलेल्या देवांना न जुमानता कुणालाच न भिता, एकेक संकटाशी दोन हात करत घरी निघाला आहे. तर दुसरा प्रवास आणि संघर्ष आहे त्याच्या मनात, ज्याचं बाह्यरूप म्हणजे खवळलेला समुद्र आहे. तो संघर्ष आहे त्याला सतत डागणी देणाऱ्या, त्याला त्याच्या कृतीचा जाब मागणाऱ्या विवेकाशी. त्याचा आतला प्रवास आहे आपली चूक मान्य न करता आपल्या कृतीचं हजारो प्रकारे समर्थन करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नापाशी सुरू होऊन ते स्वतःचा, आपण केलेल्या चुकीचा विनाअट स्वीकार करण्यापर्यंतचा. जो प्रवास कदाचित कलिंगच्या युद्धानंतर अशोकाचासुद्धा झाला असेल, आणि त्यानंतर तो बुद्धाकडे वळला असेल. नोलनच्या ओडिसिएसमध्ये आणि अशोकामध्ये मला साम्यस्थळं दिसतात. तसंच नोलनच्याच सिनेमातील अशा आंतरिक द्वंद्वामध्ये असलेली अनेक ग्रे शेडमधील पात्र आठवतात. आपण निर्माण केलेल्या बॉम्बची चाचणी डोळ्यांसमोर झाल्यावर, तसेच ते बॉम्ब जपानमध्ये पडल्यावर असाच आंतरिक प्रवास आपल्याला नोलनच्या ओपनहायमरमध्ये झालेला दिसतो.
नोलनच्या ओडिसीमध्ये आपल्याला ॲगमेनॉनचा पूर्ण चेहरा कधीच दिसत नाही, आणि तो आपल्या दृश्यपतळीवर बऱ्याच वेळा दाखवला जात नाही. बऱ्याचदा आपण त्याला लोअर अँगलमधून पाहतो, त्याच्या भव्य चिलखत आणि भव्य दडपून टाकणाऱ्या शिरस्त्राणात. अशा स्वरूपातील ॲगमेनॉन दाखवून नोलन आपल्याला मूर्तिमंत निष्ठूर सत्तापिपासू महत्वाकांक्षा दाखवत असतो. संपूर्ण चित्रपटात फक्त एकदाच आपल्याला ॲगमेनॉनचे डोळे दिसतात, जेव्हा ओडिसियसला पाताळामध्ये मेल्यानंतरचा ॲगमेनॉन भेटतो, जेव्हा तो एकमेव वेळी vulnerable होऊन मानवी पातळीवर येऊन आपल्या मृत्यूबद्दल सांगत असतो. अर्थात, इथेही त्याचा पूर्ण चेहरा दिसत नाहीच, त्याच्या भव्य शिरस्त्राणातून फक्त त्याचे डोळे आपणाला दिसतात. ॲगमेनॉनची भूमिका साकारणारा बेनी साफडी हा चांगला अभिनेता आहे. तो साफडी बंधू या अलीकडील प्रसिद्ध दिग्दर्शक बंधूंमधील एक आहे. त्याने आपली अभिनयक्षमता "Good Time" मधून सिद्ध केलीच आहे. पण त्याने चेहरा दाखवून जेवढ्या प्रमाणात मूर्तिमंत निष्ठूर सत्तापिपासू महत्वाकांक्षा दाखवली असती त्याच्या कित्येक पटीने ती नुसत्या त्याच्या भव्य शिरस्त्राणातून व्यक्त होते, आणि IMAX मध्ये तर अक्षरशः अंगावर येते !
ओडिसिएसचा वापर करून, लाकडी घोड्याचा कपटीपणा करून ॲगमेनॉन आपले मनसुबे साध्य करतो. आपल्या भावाची बायको परत आणणं हे तर एक निमित्त असतं. त्याला खरं तर ट्रॉयवर आपली अधिसत्ता स्थापित करायची असते, आणि त्या माध्यमातून सागरी व्यापारावर नियंत्रण मिळवायचं असतं. असे कित्येक ॲगमेनॉन आपल्या अंतस्थ हेतू, मनसुबे साधून घेण्यासाठी, सरळ सरळ आपल्या शत्रूला संपवू शकत नसले तर ट्रोजन घोड्यांच्या, ओडिसिएसच्या माध्यमातून आपला कार्यभाग अत्यंत कपटीपणे साधत असतात. ओडिसियस मग जन्मभर पश्चाताप करत राहिला तरी झालेली हानी त्याने कधीच भरून येतं नसते.
नोलनच्या ओडिसीबद्दल खूप खूप काही लिहिण्यासारखं आहे. मी आतापर्यंत तीनदा पाहिला आणि प्रत्येकवेळी एक नवा पदर उलगडत गेला. तसा सरळ सरळ पहिला तर ही एक IMAX मध्ये शूट झालेली पुराणकथा पडद्यावर बघण्यात मजा आहेच. भव्य दृश्यं, सुंदर फ्रेम्स, त्यांच्या प्रमाणबद्ध रचना (compositions), अतिशय परिणामकारक पार्श्वसंगीत, वास्तवाजवळ जाणारे मॅजिकल रियालिजमची प्रचिती देणारे अद्भुतरम्य प्रसंग, रंजक ऍक्शन हे सगळं पहिल्या बघण्यात पहायला मजा येतेच आणि नुसतं हे पाहूनही चित्रपट मजा देतो. पण मग जेव्हा आपण आणखी जागरूक राहून डोळसपणे पडद्यावर दिग्दर्शक जे दाखवू पाहतो, एखादं दृश्य अस का दाखवलं असेल, एखादं पात्र अस का दाखवलं असेल, याचा विचार करत चित्रपट पाहतो तेव्हा आपल्याला चित्रपटातील एव्हाना अदृश्य असणारे अनेक लेअर दिसू लागतात, आणि चित्रपट आपल्यावर आणखी खोल परिमाण करत जातो. मग ती केवळ एक भव्य स्वरूपात दाखवलेली ग्रीकपुरणातील मिथककथा राहत नाही, ती वर्तमानात, अगदी आजसुद्धा समर्पक, प्रासंगिक असणारी सर्वकालिक बोधकथा बनते. जेव्हा एखादी कथा स्थळकाळाच्या सीमारेषा ओलांडून ती सर्वकालिक, सार्वत्रिक होते, जेव्हा तिला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील व्यक्ती आपल्या जगण्याशी जोडून पाहू लागतो, जेव्हा ती कथा मानवी असते, आणि माणूस म्हणून असणाऱ्या तुमच्या मर्यादा उघड्या पाडून एक आशावादही निर्माण करते, माणूस म्हणून तुम्हाला समृद्ध करते तेव्हा ती कथा, आणि ज्या माध्यमातून ती कथा सांगितली जाते ते माध्यम आणि ती कथा तुमच्यापर्यंत पोहोचवणारा सर्जनशील कलाकार, यांना "अभिजात"पणा प्राप्त होते. नोलनचा " द ओडिसी" असाच एक अभिजात चित्रपट आहे.
नक्की बघा. पडद्यावरच बघा, मोबाईलमध्ये अजिबात बघू नका. आणि शक्य झालंच तर IMAX मध्ये बघा. मुळात आपल्याकडे नोलनने ज्या IMAX पडद्यासाठी सूट केलं आहे तसा पडदा उपलब्ध नाही, त्यामुळे आपल्याकडील IMAX मध्येच सिनेमा पाहताना आपण २५% कापलेलं (cropped) दृश्य पाहत असतो. त्यात जर रेग्युलर पडद्यावर सिनेमा पाहत असू तर ते दृश्य ४०% कापलेल दिसतं, आणि त्यात तुम्ही मोबाईलवर बघणार...! त्यामुळे थिएटरमध्येच मोठ्या पडद्यावर बघा अशी एक सिनेफाईल म्हणून नम्र विनंती.
अभिजीत कदम | २४ जुलै २०२६.








.jpeg)



