"धुईन (Fog) : धुक्यात हरवलेल्या स्ट्रगलरची गोष्ट"
- अभिजित कदम.
#Dhuin
#Achal_Mishra
कधी शंभरातल्या नव्व्याण्णव जणांचा प्रतिनिधी, कधी Disciple मधील शरद नेरुळकर, कधी सदाशिव पेठेतील कुठल्यातरी अभ्यासिकेत पुस्तकात डोकं घालून बसलेला कुणीतरी, भरत आंधळे-विश्वास नांगरे पाटीलांचं भाषण भाबड्या डोळ्यांनी पाहणारा कुणीतरी, chain marketing च्या कुठल्यातरी सेमिनारमध्ये कोट चढवून बसलेला कुणीतरी...अशा कितीतरी जणांचा प्रतिनिधी वाटला "धुईन" मधील पंकज.
जवळपास प्रत्येकच क्षेत्रात यशस्वी होऊन कौतुक झालेली काही प्रसिद्ध नावं असतात, त्यांची भाषणं , त्यांच्या मुलाखती, त्यांच्या struggle च्या कहाण्या आणि त्यांचे सुप्रसिद्ध किस्से या चमकदार पृष्ठभागाखाली कितीतरी खोलवर गाडले गेलेले असतात यांच्याइतकेच कष्ट घेतलेल्या, struggle असणाऱ्या कित्येक अयशस्वी स्वप्नांचे सापळे. बऱ्याचदा वास्तवाशी फारकत घेऊन, तथाकथित मोटिवेशनल भाषणं ऐकून, मुलाखती-किस्से ऐकून, struggle च्या कहाण्या वाचून, अवास्तव महत्वकांक्षेचा डोंगर डोक्यावर घेऊन अनेक जण स्वप्नांच्या बाजारात फिरत असतात. बऱ्याचदा पात्रता असूनही परिस्थिती योग्य नसते, चुका - मर्यादा कळत असूनही वळवून घ्यायच्या नसतात. अशा कितीतरी कारणांनी वास्तवाच्या चटक्यांनी स्वप्नं करपून जातात, तेव्हा यातीलच काही strugglers त्या क्षेत्राबद्दलच मनात नकारात्मक मत बनवून घेतात, आणि ताज्या strugglers ना कोमेजून टाकत एक चक्र पूर्ण करतात.
शाहरुख, मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन, पंकज त्रिपाठी, पियुष मिश्रा यांच्या कितीतरी मुलाखती, किस्से प्रसिद्ध असतात. मनोज वाजपेयीचा मुंबईत येण्याचा किस्सा, शाहरुख चा मरिन ड्राइव्हचा किस्सा, नवाजच्या दहा-बारा वर्षांच्या struggle ची कहाणी हे सगळं ऐकून हिरो किंवा अभिनेता बनण्याची स्वप्नं घेऊन भारतातून कितीतरी जण उमेदवा-या घेऊन मुंबईत येत असतील. त्यातील अत्यंत कमी प्रमाणात, किंवा शंभरातील एकजण सोडला तर राहिलेले नव्व्याण्णवजण, विश्वास नांगरे पाटील-भरत आंधळे यांची भाषणं ऐकून सदाशिव पेठेत येऊन अभ्यासिकांमध्ये बसणारांमधील नव्व्याण्णवजण बऱ्याचदा धुक्यात स्वेच्छेनं अडकून बसतात. "मै माधुरी दीक्षित बनना चाहती हूं" म्हणून मुंबईत जाणाऱ्या extraमध्ये नाचणाऱ्या मुलींचा तर हिशेबच मांडवत नाही. बिढार मधील चौहान पासून, मी टू मध्ये बाहेर आलेल्या गोष्टींपासून ते गंगुबाई काठियावाडपर्यंत पसरले आहेत स्वप्नांच्या चुराड्यासोबत विकावे लागलेले शरीरांचे खच.
मरे हुए सपनों के लाशों के ढेर के उपर बिखरे चंद सितातों के गीत गाती है ये दुनिया.
धुईन पाहताना असल्या अर्ध्यमेल्या स्वप्नांची ओझी वाहत हतबलपणे परिस्थितीला शरण जाऊन जगणारे कित्येकजण आठवले - बाहेर, आत असलेले! त्या घुसळनीत कितीतरी काहीकाही सुचत गेलं. असो.
तर बिहारमधील अचल मिश्रा या दिग्दर्शकाचा मैथिली-हिंदी भाषेतील "धुईन" हा ५० मिनिटांचा चित्रपट नुकताच पहिला. आपल्या भाषेवर, मातीवर प्रेम असणाऱ्या या दिग्दर्शकाचा हा दुसरा सिनेमा. या दिग्दर्शकाचं वैशिष्ट्य म्हणजे long shots, ठहाराव असलेले शॉट्स, वातावरणातील transitions दाखवणाऱ्या - कधी कधी एखाद्या painting सारख्या वाटणाऱ्या- अभिनेत्याच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव शांतपणे टिपणाऱ्या - त्याच्या हालचालीतून जाणवणारी मनातील आंदोलनं पोहोचवणा-या अतिशय सुंदर हळुवार फ्रेम्स, कट्सचा कमी वापर इत्यादी. एखादा संवाद चालू असला तर सारखे बोलणाऱ्याचे चेहरे सारखे दाखवणारे कट्स अजिबात नाहीत, त्यामुळं आपण ज्या पात्रावर कॅमेरा स्थिर आहे, त्याच्या भावविश्वाशी खूप एकरूप होऊन जातो, तीच गोष्ट दृश्यातील परिसराची, किंवा दोन व्यक्तींमधील किंवा व्यक्ती आणि परिसर यांच्यातील होणाऱ्या शब्दांशिवायच्या संवादाची.
(पुढील परिच्छेदात रूढार्थाने spoiler आहे. ज्यांना कुठलंही दृष्य सिनेमा पाहण्याआधी माहिती झालेलं आवडत नाही त्यांनी हा परिच्छेद सोडून पुढे वाचावं)
एका दृश्यात पंकज त्याच्या एका सिनियर आणि त्या सिनियरच्या दोन "फिल्ममेकर" मित्रांसोबत एका ग्राउंडवर बसला आहे. पंकजचा सिनियर त्याच्या दोन मित्रांसोबत गप्पा मारत बसला आहे, पंकज ऐकतच आहे. तो सिनियर अब्बास कियारोस्तामी या इराणी दिग्दर्शकाच्या त्याने केलेल्या कार्यशाळेबद्दल सांगतोय, मग तो सिनियर आणि ते फिल्ममेकर कियारोस्तामीच्या सिनेमाबद्दल गप्पा मारतात. मग एखाद्या कलाकाराने एका मर्यादेमध्ये राहून काम करावं की ती मर्यादा सोडून देऊन काम करावं यावर ते बोलतात, पंकजला त्याबद्दल त्याचं मत विचारतात. पंकजला अभिनेता बनायचं असलं तरी त्याला हे खूप जड जात आहे, तो त्यांच्या जड जड गप्पांमुळं दबत दबत चालला आहे. त्याला यावर मत व्यक्त करता येत नाही, मग ते जाणीवपूर्वक विषय बदलतात वैगेरे. या पूर्ण दृश्यात कॅमेरा जास्तीत जास्त वेळ पंकजच्या चेहऱ्यावर केंद्रित आहे. आणि त्यांच्या गप्पांमुळे दबत चाललेल्या पंकजचा चेहरा कॅमेरा अतिशय अप्रतिमपणे दाखवतो, अर्थात पंकजची भूमिका करणारा अभिनव झा यानेही अतिशय सुंदर अभिनय केला आहेच. कलाकाराच्या मर्यादेबद्दल चर्चा सुरू असताना कॅमेरा त्याच ग्राउंडवर ड्रायविंग क्लासची गोलगोल फिरणारी गाडी दाखवत राहतो! मला हा सिन खूप आवडला. एका दृश्यात पंकज संध्याकाळी नदीकाठी उभा आहे, दुसऱ्या एका दृश्यात आंदोलीत मनाने रंग बदलणाऱ्या संध्याकाळी धुक्यातून घरी जाणारा पंकज, शेवटी वडिलांसोबत गाडीवर जाणारा पंकज आणि काही वेळानंतर दिसणारी धुक्यातील शेतं ह्या आणि यासारख्या फ्रेम्स पाहताना एखादं सुंदर painting पाहत असल्याचा अनुभव येतो!
कुठल्याही क्षेत्रात नवीन उतरलेले उमेदवार त्यांच्या सिनिअर्सवर सुरुवातीला आपली भिस्त ठेऊन असतात. त्या क्षेत्रात बराच काळ struggle करून मोठा अनुभव गाठीला असलेले सिनिअर्स मग नवीन उमेदवारांना जडजड शब्दात, नव्या उमेदवारांच्या डोक्यांवर ओझी ठेवत मार्गदर्शन करत असतात. काही कालावधीने अनुभवावर आधारित सिनिअर्सची उतरंड तयार होते. ही व्यवस्था बऱ्याच क्षेत्रांत पाहायला मिळते. (अर्थात याला चांगले अपवादही असतातच.) बाकी टोमणे ऐकून घेणं ही struggler असण्याचं एक लक्षणच असतं. खरं तर struggler म्हणून शिक्का पडेपर्यंत कित्येक वर्षं struggle करून काही हशील होणार नाही याची लवकर समज येऊन दुसरं काही करणं शहाणपणाचं असतं. पण हा शहाणपणा कळून वळत नसल्यानं struggler राहण्यातच एक व्यसनी समाधान मिळत असतं. अशा ठरवून struggler राहण्याच्या तपश्चर्येतुन एखाद्या नवाजला मोठा ब्रेक मिळतो, नाहीतर कित्येक पंकज धुक्यात वाट शोधत राहतात. काहीजण "सुबह का भुला शाम को वापस आए तो उसे भुला नाही केहते" या फिल्मी म्हणीप्रमाणं धुक्यातून घरी येऊन स्पष्ट पाहू लागतात, तर काही धुक्यात हरवून जातात. हे struggler च्या जगण्यातले सगळे संदर्भ "धुईन" आपल्यासमोर मांडतो.
पन्नास मिनिटांचा हा चित्रपट त्याच्या विषयासाठी, सुंदर दृश्यांसाठी, कॅमेऱ्याच्या सुंदर हालचालींसाठी, अभिनयासाठी नक्की पहावा.
MUBI, AMAZON PRIME वर उपलब्ध आहे. याच दिग्दर्शकाचा अशीच ट्रीटमेंट असणारा "गमक घर (The Village House)" हा सुद्धा सुंदर नॉस्टॅल्जिक चित्रपट आहे, मुबीवर उपलब्ध आहे.
- अभिजित कदम.
