#दोबारा#
#Dobara
#2:12
#Mirage
Time Travel : Checked!
Alternate Reality : Checked!
Parallel Universe : Checked!
Chaos Theory : Checked!
Butterfly Effect : Checked!
Anurag & Tapasi : Cherry on the cake. (मला दूध आवडत नसल्याने दुधात साखर असं लिहिलेलं नाही, कुणाच्या भावना दुखल्यास क्षमस्व,)
और क्या चाहीये अपने को!
गेल्याच आठवड्यात शिवराजनं #Mirage बद्दल सांगितलेलं, time travel वर आहे पिच्चर म्हणून. Watchlist मध्ये होताच पडून बरेच दिवस, बघणारही होतो रिकमंडेशनही मिळाल्यामुळे. तेवढ्यात आज दोबारा पहिला! सुरुवातीलाच mirage वरून adapt केला असल्याचं वाचलं, आणि भरून पावलो.
अर्थात spoil अजिबात करणार नाही. ट्रेलर बघून वरील themes आहेत हे समजेलच. मान्सून शुटआउट आणि JL50 नंतर वरील थिम्सवर आलेला बहुतेक तिसरा चांगला हिंदी पिच्चर / सिरीज असेल. तापसी पन्नूचा काय प्रेझेन्स आहे राव! चांगला दिग्दर्शक कलाकारातील अभिनेत्याला बाहेर काढू शकतो, त्याला खुलवू शकतो. राहुल भट, सुकांत गोएल ज्यांची नावंही आधी माहिती नव्हती, ती आज जाणून घ्यावी वाटली, त्यांचा अभिनय आवडला. सास्वता चटर्जी तर कहानीमधील बॉब बिस्वासमुळं ओळखीचे होतेच, त्यांचंही नाव आज समजलं. AK vs AK मध्ये अनुराग ने स्वतःला सस्ता टारांटीनो म्हणवून घेतलं होतं! आता त्याला गरिबांचा नोलान म्हणायला हरकत नाही! अर्थात, jokes apart, पिच्चर चांगलाच आहे.
दोबारा पाहून आल्यानंतर लगेच netflix वर mirage ही पहिला. "During the Storm" या इंग्रजी अर्थाच्या मूळच्या "Durante la tormenta" नावाच्या स्पॅनिश चित्रपटाचं इंग्रजीतील mirage हे नाव. मृगजळ, आभास या अर्थानं. Mirage हे इंग्रजी नाव मूळ स्पॅनिश नावापेक्षा जास्ती समर्पक वाटतं. Mirage मध्ये एक संभाषण आहे. सिनेमातील प्रोटागोनिस्ट समांतर विश्वातील पर्यायी वास्तवात गेलेली आहे. Time travel आणि वरील themes या विषयावर एक कादंबरी लिहिलेल्या physics च्या प्रोफेसर असलेल्या लेखिकेला ती भेटते. तेव्हा त्या दोघी वरील विषयांच्या शक्यतेबद्दल बोलत असतात. त्या प्रोफेसरचा खरंच असं काही घडू शकेल यावर विश्वास नसतो. तेव्हा Time travel च्या संदर्भात प्रोटागोनिस्ट प्रोफेसरला सांगते, "माझं अस्तित्व आहे (पर्यायी वास्तवात- alternate reality मध्ये), आणि तिला काही फोटो दाखवत म्हणते की हे फोटोसुद्धा हेच सिद्ध करतात." यावर ती प्रोफेसर उतरते, "यातून काहीच सिद्ध होत नाही. आपण अर्थ लावत असतो. आपल्याला एवढंच माहितीये की आपला मेंदू जे अनुभवतो, त्याला तो खरं मानतो. तो एखाद्या आभासाला खरं समजतो. जर वास्तव हाच आभास असला तर काय होईल?" तिचं उत्तर (की प्रश्न!) ऐकून जुनेच प्रश्न परत समोर येतात - खरं काय आहे? स्वप्न खरं असतं? भूतकाळात काहीही घडून गेलेलं ते आपण जेव्हा आठवतो, तेव्हा ती फक्त कल्पना असते. जे सगळं घडलं ते जसंच्या तसं प्रत्येक बारीक तपशीलासह आठवत नाही, आणि कित्येक वर्षांनंतर तर खूपच पुसट आठवणी राहतात, बऱ्याचदा चुकीचंही आठवतं, मग भूतकाळातील आठवण ही कल्पनाच असते का खरं असतं? भविष्यात काही गोष्टी घडणार असे ठोकताळे आपण बांधतो, पण अगदी तसंच अजिबात घडत नाही, कारण भविष्याचं मनात येणारं चित्र हीसुद्धा कल्पनाच असते. खरं काय असतं? अस्तित्व काय असतं? असे अस्तित्ववादी प्रश्न काही प्रमाणात mirage निर्माण करतो. तसंच "Hilbert Space" , "Theory of cosmic web by Richard Gott" यांचा जाताजाता उल्लेख येतो. अर्थात हे उल्लेख उगाच जाताजाता केलेले नसतात. याबद्दल मी अजून समजून घेणं बाकी आहे. नारळीकरांची विज्ञानकथा वाचल्यानंतर ती कथा ज्यावर बेतली आहे, ती वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्याची इच्छा व्हावी, तशी इच्छा चांगला sci - fi (आणि त्यातल्या त्यात वरील themes वर असल्यावर) चित्रपट पाहिल्यावर होते. तरीही mirage मध्ये विज्ञानातील संकल्पनानांचा उल्लेख चवीपुरता वापरलेला आहे, जास्ती भर अशा themes मधून निर्माण होणाऱ्या भावनिक नाट्यावर आहे. नोलनभाऊंचा interstellar पाहिल्यावर नंतर त्याची पारायणे करताना "warmhole", "blackhole", "gravitational time dilation" , "Murphy's law" अशा वैज्ञानिक-तत्वज्ञानविषयक संकल्पनांबद्दल समजलं. Interstellar साठी नोलनभाऊंचे किप थॉर्न हे सल्लागार होते. ज्यांना त्यांच्या भौतिकशास्त्रातील योगदानासाठी नंतर नोबेल मिळाला. नोलननी चित्रपटात दाखवलेल्या गोष्टी वैज्ञानिकदृष्ट्या जास्तीत जास्त अचूक होण्यासाठी त्यांचा सल्ला घेतला होता. Interstellar मध्ये दाखवलेलं कृष्णविवर (black hole) किप यांच्या सल्ल्याने गणितं मांडून कसं दिसत असेल तसं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. Interstellar साठी नोलनने ५०० एकर मका लावली होती! चित्रीकरणानंतर ती विकुनही नफा मिळवला होता. नोलनबद्दल, Interstellar बद्दल किती बोलायचं! Interstellar चे visuals, हान्स झिमरचा sonudtrack याबद्दल काय बोलायचं!
असो, तर सांगायचं काय होतं की mirage मध्ये विज्ञानातील संकल्पनांचा ओझरता संदर्भ, तत्वज्ञानावरील भाष्य असं काही होतं. त्यामुळं त्याला आणखी मिती मिळाल्या. दोबारामध्ये तशी काही चर्चा असती तर आणखी मजा आली असती.अर्थात, दोबारामध्ये वरील विषयांवर जास्त भाष्य नसलं तरी राजकीय टिपणी अवश्य आहे. Mirage मधील एका प्रसंगात नसणारी ओळ अनुरागने चपखलपणे दोबारामधील अशाच एका प्रसंगात टाकलीय. दोबारामध्ये पोलीस चौकशीच्या एका प्रसंगात, ज्याची चौकशी चालू आहे तो म्हणतो "I want to talk with my lawyer" तेव्हा पोलीस अधीकारी त्याला उत्तरतो "ये अमरीका नही है, यहा ऐसेही किसीकोभी उठाके अंदर डालते है, तुम्हारा तो सबुत मिला है.." तसंच अनुरागने सिनेमामध्ये त्याचा सिग्नेचर डार्कनेस आणला नाही, तरी एक ओझरता प्रसंग आणि "जरूरत इंसान को जल्लाद बनाती है" असा हिंसेवर भाष्य करणारा डायलॉग होताच.
बाकी चांगलाच आहे दोबारा. सिनेमाच्या नाव पडद्यावर दिसण्याची वेळ, पद्धत आणि नाव सगळं मजेशीर आहे. मूळ mirage मध्ये नसलेले terminator, डॉक्टर Strange, ख्रितोफर नोलन यांचे उल्लेख अनुरागने tribute म्हणून आणि खूप मजेशीर पद्धतीने टाकलेत. माझ्या आवडत्या themes वर असणारा हिंदीतील, आणि त्यात अनुरागचा आणि तापसीचा पिच्चर! आवडेल असं अपेक्षित होतं, आणि अपेक्षाभंग अजिबात झाला नाही.
तळतीप : बॉयकॉट केलेला आणि पाहिलेला दुसरा पिच्चर चांगला निघाला. (लाल सिंग चढ्ढा चांगला होता. आमिरचा forrest चा प्रयत्न बऱ्यापैकी होता. भारतातील घटना आणि भारतीय संदर्भातील बदल अतुल कुलकर्णींनी चांगले केलेत.) सदर तळतीप अत्यंत मर्यादित डेटावरील निरीक्षण असून याला णिशेदात्मक, राजकीय इत्यादी लिखाण समजू नये. तसा समज झाल्यास होणाऱ्या त्रासाची जबाबदारी सदर लिहिणारा घेत नाही.
- अभिजित कदम.
३०.०८.२०२२.

.jpeg)
