Saturday, 20 June 2026

"मैं वापस आऊ्ंगा" - हरवून गेलेल्या स्वतःचा शोध.

वापस किधर आना है? कुठं परत यायचं आहे? हा इम्तियाज अली कुठल्या परत येण्याबद्दल बोलत आहे? आणि सारखा बोलत असतो??इम्तियाज अलीची नादान परिंद्याला पुन्हा हाक आहे, घरी ये म्हणून...

तो नादान परिंदा कोण आहे? 

स्वतःचा शोध घेताघेता, काय पाहिजे ते दिसलं असूनही तिथे पोहोचू शकत नसल्याची भळभळती जखम घेऊन जगणारा अश्वत्थामा आहे तो. तो आहे जॉर्डन जो हिरपर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्या अपूर्णत्वातून जन्म घेतं ज्वाला ओकणारं संगीत...पेटलेली गिटार...

तो नादान परिंदा आहे वेद. खोलवर गाडलेल्या स्वतःलाच उकरून बाहेर काढणारा...

ती आहे गीत, हरवलेल्या स्वतःपाशीच पुन्हा परत येणारी...

तो आहे "मैं वापस आऊ्ंगा" मधील आजोबांच्या परत जाण्याला शोधत स्वतःचाच शोध लागलेला निर्वैर! 

इम्तियाजच्या सिनेमात बऱ्याचदा हा नादान परिंदा दिसतो. स्वतःचा शोध असतो. सिनेमातील मध्यवर्ती पात्राच्या आयुष्यात त्याला काहीतरी धक्का बसतो, आणि त्या नादान परिंद्याचा स्वतःकडे प्रवास सुरू होतो...

या सिनेमांमध्ये त्या पात्राचा स्व गवसल्याचा प्रसंग नेहमीच अतिशय उत्कट असतो, चित्रपटाचा तो अत्युच्च बिंदू असतो, किमान माझ्यासाठी तरी तो तसा राहिला आहे.... जेव्हा जनार्दन "कुन फाया कुन" गात असताना एकदम वर पाहतो, जेव्हा वेद स्वतःकडे आरशात पाहतो, जेव्हा निर्वैर कावेरीशी फोनवर बोलत बोलत घराच्या बाहेर येऊन बसतो... अर्थात मला तरी आत्ता एवढे आठवतात...

आणि नासिर !!!! व्वा!!! ❤️नासिरच्या आजोबांकडे पाहताना "छोड आए हम वो गलिया..." लिहिणारा गुलजार आठवतो... 

 ज्या सीमारेषेवरून ज्याचं पूर्ण आयुष्य बदललं, ज्याचं घर, गाव, मुळं सुटली त्या सीमारेषेच्या पलीकडं असणाऱ्या आपल्या गावाच्या प्रेमात, "सरहदीपलीकडच्या गावचा" अशी आपली ओळख रहावी म्हणून आपलं आडनावच "सरहदी" करणारा, मुळांना घट्ट पकडलेला सागर सरहदी आठवतो...

(सागर सरहदी तर सिनेमा पाहताना क्षणाक्षणाला आठवत होते. काही दिवसांपूर्वी इरफानने घेतलेली त्यांची मुलाखत ऐकली होती. त्यात ते एकदम सिनेमातील नासिरने केलेल्या आजोबांसारखेच भूतकाळातील त्या क्षणातच अडकले होते... अवघं शरीर जीर्ण झालं तरी कपाळावरची जखम तशीच ताजी असणारे...)

सिनेमात नासिरला closure मिळालं पण सागर सरहदींसारखी कित्येक माणसं शेवटपर्यंत closure न मिळताच तडफडत राहिली...

रस्त्याच्या कामात माझ्या घरासमोरील, माझ्या अतिशय जवळचं एक झाड मुळासकट उखडून दुसरीकडे लावलं गेलं. अशी मुळासकट उपटून दुसरीकडे लावलेली झाडं गावाहून फलटणला जाताना रस्त्याला बऱ्याचदा दिसतात...पण ती नव्याने कधी चांगली फुटूच शकलेली नाहीत. कित्येक तर फुटलीच नाहीत. काही झाडांचे मोठाले बुंधे आणि खुरटलेल्या लहान फांद्या बघून आतवर खूप काही तुटतं.. असल्याच एका झाडाची भूमिका काय जगालाय नासिर...!

द्वेष, हिंसा, युद्ध यातून होणारा विध्वंस.. माणूस न वाटावे असे पिसाळलेले न जाणो कुठल्या ग्रहावरून - मंगळावरून आलेले लोक...आणि अंगावर येणारी ती दृश्यं डोक्यातून जात नाहीत..शेवटी पडणाऱ्या इमारती, रडणारी लहान मुलं यांचे मोन्ताज....खुर्चीवरून शेवटच नाव संपून जाईपर्यंत उठून दिलं नाही...आणि अजून डोक्यातून गेल नाही...


- अभिजीत कदम.







No comments:

Post a Comment