टीझर आणि ट्रेलर कट करणे ही एक कला आहे. टीझरचं कामच मुळी टीज (tease) करणं असतं. प्रेक्षकांच्यात एक उत्सुकता निर्माण करणं, सिनेमात काय असेल याबद्दल एकदम हलकीच पण अतिशय परिणामकारक झलक देऊन त्याच्यात चित्रपटाबद्दल कथेची जास्त माहिती न देताही कुतूहल निर्माण करणं. चांगला टीझर संभाव्य प्रेक्षकांच्यात "दिदार को तरसे अखियां" (हे हिमेशच्या आवाजात ऐकू येईल असं वाचावं) अवस्था निर्माण करतो, वारंवार टीझर पाहायला भाग पाडतो.
ट्रेलरमध्ये मात्र कथानक काय असेल, याबद्दल प्राथमिक अवगत केलं जातं. त्यातून सिनेमाची ट्रिटमेंट कशी असेल हे समजतं. चित्रपटाचा जॉनर (genre) / प्रकार काय असेल हे टीझर वरून समजलेलं असतंच. ट्रेलरमध्ये मात्र कथानकाबद्दल एकदम प्राथमिक माहिती, चित्रपटाची ट्रिटमेंट कशी आहे, त्याचं संगीत, प्रमुख पात्रं, आणि उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी महत्त्वाचे highlights, catchy संवाद हे प्रमुख घटक असतात.
अर्थात, एकदम पूर्ण व्यावसायिक, हिरोप्रधान चित्रपटांच्या ट्रेलरला वेगळी परिमाणं असतात. उदा. सलमानच्या एका सिनेमाच्या टीझरमध्ये फक्त त्याच्या हातातील ब्रेस्लेट दाखवलं होतं. पण असे चित्रपट सोडले तर इतर कथाप्रधान / आशयप्रधान परंतु तरी व्यावसायिक चित्रपटांच्या टीझरमध्ये आणि ट्रेलरमध्ये वरील घटक असतात.
काही टीझर मात्र अतिशय हटके असतात. उदा. राजकुमार हिरानीची आगामी सिरीज "प्रीतम और पेड्रो" याचा टीझर मला खूप आवडला होता. त्याचं पार्श्वसंगीत आणि प्रमोशनसाठीचं गाणं, त्याचे lyrics आणि व्हिसुअल्स एकदम भारी होते, पुन्हा पुन्हा ऐकले होते.
तसंच अलीकडच्या काळाचा असाच एक अतिशय चांगला कापलेला टीझर आणि ट्रेलर धुरंधर च्या पहिल्या भागाचा तसंच ॲनिमलचा होता. पुनःपुन्हा पहावा वाटणारा. धुरंधरमधील अपारंपरिक पद्धतीने समोर आलेली पात्ररचना पहिल्यांदा ट्रेलरमध्ये पाहताना आश्चर्याचा धक्का बसला होता. मागे सरलेले केस, चष्म्यातील भेदक नजर, सिगरेटमुळे काळे पडलेले ओठ...अरे! हा तर माधवन आहे! असाच धक्का अर्जुन रामपालला पाहताना बसला होता. ट्रेलरमध्ये नाव दाखवल्यानंतर एक काही सेकंदाचा पीक पॉईंट असतोच असतो. त्यात खूप क्रिएटिव्ह काहीकाही केलं जातं. विनोदी जॉनर असेल तर एखादा विनोद असतो, थ्रिलर असेल तर शॉक बसेल असं काहीतरी असतं. असला पिक पॉईंट मला ॲनिमलच्या ट्रेलरमध्ये आवडला होता. काही सेकंदांसाठी दिसणारा, चाकू फिरवणारा बॉबी देओल आणि त्याच्या चेहऱ्यावरील क्षणार्धात बदलणारे भाव....व्वा!! अनुरागच्या रमण राघव २.० च्या ट्रेलरमधील पिक पॉईंट असाच लक्षात राहण्यासारखा होता, खिडकीतून "निकालो बाहर मुझे" म्हणत एकदम रागात रडत ओरडणारा नवाज, एकदमच शांत होऊन खिडकीतून आपला आवाज कुणी ऐकला का ते बाहेर बघतो....रंगबदलू सरडा!
पूर्वी म्हणजे जेव्हा सिनेमा डिजिटल नव्हता आणि फिल्मवर बनत होता, तेव्हा सिनेमा झाल्यावर त्याच रीळावर नव्या सिनेमातील काही भाग जोडला जायचा. म्हणजे मुख्य सिनेमाच्या रीळाला ट्रेलरसारखा जोडला जायचा म्हणून त्याचं नाव ट्रेलर पडलं...आता फिल्म राहिल्या नाहीत, आणि ट्रेलर स्वतंत्रपणे समाजमाध्यमांवर दिसू लागले, पण त्याचं नाव तसंच राहिलं.... ट्रेलर!
असो. तर या लिखाणाला निमित्त ठरलेला आहे नागराज मंजुळेंच्या आगामी "खाशाबा" या चित्रपटाचा अतिशय सुंदर कापलेला टीझर... हळूहळू मनाचा ताबा घेत घेत वीर रस जागृत करणारं अजय अतुल यांचं संगीत आणि "खाशाबा" title song/ anthem ची झलक, आणि त्या संगीतावर स्वार होत अर्थात संगीताच्या सलग मोठ्या तुकड्यावर चिकटवलेले सुंदर, उत्कंठा शिगेला पोहोचवणारे, उत्सुकता निर्माण करणारे visuals... बंडी आणि लेंगा घालून शेतात गोफणीतून दगड भिरकावणारा खाशाबा, विहिरीतून पाणी काढताना, म्हशीला धुताना दिसणारं त्याचं पिळदार शरीर, आणि मग एकामागोमाग येत जाणारे व्यक्ती, स्थळ, काळाचे संदर्भ, आणि अभिनेते न दिसता पात्रांच्या माध्यमातून दिसणारे जितू जोशी, गिरीश कुलकर्णी, छाया कदम,सुरेश विश्वकर्मा, महेश मांजरेकर, ओम भूतकर, गार्गी कुलकर्णी ( सहनिर्मितीसुद्धा), संदीप कुलकर्णी, वैभव मांगले, दस्तुरखुद्द अण्णा, कोल्हापूरचे महाराज आणि बहुतेक मोरारजी देसाई यांची पात्रं साकारणारे अभिनेते... अजय अतुल नाव येताच एकदम हत्तीचा आवाज आणि सुरू होणारी "खाशाबा" anthen... आणि उत्कंठा शिगेला पोहोचविणारा खाशाबांचे पात्र साकार करणारा अभिनेता...कोण आहे, कोण आहे...आता दिसेल, मग दिसेल...नाही दिसणार, कारण तुम्हाला tease करायचं आहे...अजून थोडी वाट बघा... आणि "खाशाबा" हे नाव आल्यानंतर, जेव्हा पार्श्वसंगीत आणि गाणं अत्युच्च पातळी गाठतं तेव्हा मातीच्या - जमिनीच्या रूपातील फॉन्टमध्ये, एकदम स्टाईलमध्ये उमटणारी अक्षरे ..."a film by Nagraj Popatrao Manjule"!!! व्वा!
जीतू जोशीचा लुक, आणि त्याला पळताना पाहून, त्याची ती लकब पाहून आण्णांनी एकदम काहीतरी अस्सल पकडल्याचं दिसतं... असंच वाटतं एकदम काही सेकंदासाठी दिसणाऱ्या छाया कदमला पाहताना, खाशाबांची भुमिका करणारा अनामिक (!) शेतात नांगरत असताना एक पाय वर आणि एक पाय जमिनीत ठेवताना...बापू बिरू वाटेगावकर स्टाईलमधील (की त्यांचंच पात्र!) पात्र रंगवणारा अण्णा पाहताना...(बहुतेक) कोल्हापूरचे शाहू महाराज साकारणारे पात्र पाहताना.....
किमान दहावेळा तरी टीझर पहिला असेल आणि किमान वीस वेळा तरी ऐकला असेल...
पूर्ण आनंद घ्यायचा असेल तर कानाला हेडफोन लावा, youtube वर आटपाटच्या अधिकृत चॅनेलवर जाऊन टीझर फक्त सुरू करून लगेच pause करा. सेटिंगमध्ये जाऊन व्हिडिओ क्वालिटी कमीत कमी १०८० वर ठेवा, स्क्रीन आडवी करा, आणि मग प्ले करा... आणि एका अतिशय सुंदरपणे कापलेल्या टीझरचा आस्वाद घ्या!
- अभिजीत कदम.

No comments:
Post a Comment