Monday, 14 September 2026

Matrix युगाची चाहूल

 "हिरोशिमा - नागासाकी" सारख्या घटनांमधून अणुऊर्जेची विध्वंसक्षमता किंवा त्याचे गंभीर दूरगामी परिणाम माणसाच्या नेणिवेत नमूद झाल्याने परत तणाव निर्माण झाले तरी आण्विक शस्त्रांच्या प्रत्यक्ष वापराला कुणी धजावले नाही. यात सद्भावपूर्ण मानवतावादी दृष्टिकोन नसला तरी "भय" ही मानवी भावना निश्चितच असणार. त्यामुळे उत्तर कोरिया, चीन, रशिया सारख्या देशांकडून आक्रमकता असली तरी ते एका मर्यादेच्या पलीकडे जाणार नाहीत असं वाटतं, कारण बाटलीतून भूत बाहेर काढलं तर ते आपलाही नाश करेल, ही मानवी भीती, त्यांना तसं करू देणार नाही, अर्थात नजीकच्या भविष्यकाळात तरी नाही. 

एखाद्या आंतरराष्ट्रीय कराराची बंधनं असली, किंवा माणसातील चांगुलपणाला कितीही भावनिक आवाहनं केली, तरी त्याचा प्रभाव मर्यादितच असतो. कित्येक प्रयत्न होऊनही सगळ्या राष्ट्रांनी व्यवस्थित पालन केलेले आंतरराष्ट्रीय करार / बंधने इत्यादी, शोधून सापडणार नाहीत. मग तो पर्यावरणासंबंधी करार असो, व्यापारासंबंधी करार असो वा शस्त्रास्त्रांवर बंदीसंदर्भात करार असो. तसेच एखाद्या पाषाणहृदयी माणसाच्या काळजाला पाझर वैगेरे फुटायला भाग पाडणारी कितीही साहित्यनिर्मिती, कलानिर्मिती झाली तरी आक्रमकता, दमनशाही, प्रचंड हिंसाचार हा काही कमी झाला नाही, होणार नाही. तेंडुलकर जसे म्हणाले होते तसे "माणुसकी"मध्ये फक्त सद्गुणांचाच समावेश होत नाही. माणूस म्हणून असणाऱ्या सर्व सद्गुण, दुर्गुण इत्यादींचा समावेश माणसाच्या "माणूस" होण्यात असतो, म्हणून "माणुसकी" मध्ये त्याचा समावेश असतो. हिंसा ही माणसाने खोलवर पुरलेल्या माणूसप्राण्याची आदिम प्रेरणा असते. त्याचं काय करायचं हा प्रश्न असू शकतो, पण माणसात "हिंसा" असते, हे पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे, असंही तेंडुलकर म्हणाले होते. हे, एवढ सगळं असून "भय" हीसुद्धा मानवाच्या कृतींवर प्रभाव टाकणारी मोठी शक्ती आहे, आदिम प्रेरणा आहे. अनेक मानवी व्यवहारांच्या मुळाशी जाणते अजाणतेपणी ही भावना असते. म्हणून, कुठलाही करार किंवा माणसाच्या चांगुलपणाला केलेली आव्हानं यापेक्षा "भय" ही भावनाच माणसाला सर्वनाशापासून वाचवेल, किंवा सर्वनाशाची शक्यता पुढे ढकलत राहील. 

मानवी मेंदूमध्ये असणारी ही भयाची भावना कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये असेल? गेल्या काही दिवसांमधील काही घटनांमधून , AI च्या आंतरिक प्रगतीचा वेग पाहून "अन्थ्रोपिक"चे अमोदेई AI प्रगतीचा वेग कमी करावा, विशेषतः चीनसारख्या देशांचा हा वेग कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशी भाबडी विधाने करत आहेत. खुद्द ओपन AI ने सुद्धा "The Hugging Face incident and the road ahead" नावाचा लेख लिहून "मी तर तेव्हाच सांगितलं होतं..." ची सोय केली आहे. 

"The Hugging Face incident" नावाने परिचित घटनेमध्ये AI ने त्याला घालून दिलेल्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन, परस्पर [मानवी हस्तक्षेपाच्या पलीकडे जाऊन, स्व(?)प्रेरणेने) ] इतर AI शी संपर्क साधून, संभाषण करून, तिसऱ्याच व्यवस्थेमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत वेगवेगळ्या AI agents मध्ये झालेली संभाषणेही महत्त्वाची आहेत. यात काही AI agents ना कळत होते की ते मर्यादा ओलांडून वागत आहेत, आणि ते इतरांना तशी जाणीव करून देत होते. त्यातील काहींनी तसं समजल्यावर मर्यादेबाहेर जाण्याचं टाळलं तर काही सगळं समजूनही मर्यादेबाहेर जात राहिले., आणि हे सगळं संभाषण Open AI ने त्याच्या article मध्ये सांगितलेलं आहे !

9 सप्टेंबर 2026 रोजी Jacob Coxon यांनी Anthropicचा राजीनामा दिला. त्यांनी OpenAI आणि Anthropic या दोन्ही कंपन्यांमध्ये सुमारे तीन वर्षे AI pretraining वर काम केले होते. त्यांचा मुख्य आक्षेप असा होता: “AI खूप वेगाने self-improving होत आहे.” त्यांच्या मते OpenAI आणि Anthropic दोन्ही कंपन्या एकमेकांपेक्षा आधी "superintelligent AI" बनवण्याच्या शर्यतीत आहेत. त्यांना भीती होती की AI स्वतः "AI research" करू लागेल, स्वतःला सुधारेल, आणखी शक्तिशाली AI बनवेल आणि मानवी नियंत्रणाच्या पलीकडे जाईल. याला "recursive self-improvement" म्हणतात. Coxon यांच्या मते, कंपन्यांना हा धोका माहीत असूनही त्या स्पर्धेमुळे थांबत नाहीत. म्हणून त्यांनी Anthropic सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी याला मानवांच्या भवितव्याशी जुगार खेळण्यासारखे म्हटले. Coxonच्या राजीनाम्यानंतर Anthropicचे Alignment Science Lead Evan Hubinger यांनी सार्वजनिकपणे त्याला पाठिंबा दिला. Hubinger यांनी स्वतःचा अंदाज सांगितला की पुढील दशकात असा धोका जास्त असू शकतो. पण लगेच त्यांनी एक स्पष्टीकरण दिले. आजच्या AI बद्दल ते म्हणत नाहीत की तो लगेच मानवजातीचा नाश करेल. त्यांच्या मते सध्याच्या modelsचा धोका कमी आहे. भविष्यात AI स्वतःला सुधारण्याची प्रक्रिया वेगाने करू लागला तर परिस्थिती किती वेगाने नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, याची त्यांना भीती आहे. 



ही स्पर्धा जशी ओपन AI आणि Anthropic मध्ये सुरू आहे तशीच स्पर्धा राष्ट्रांमध्येदेखील सुरू आहे. वातावरण बदलाला "Hoax" म्हणणारे अमेरिकेचे अध्यक्ष एका बाजूला आहेत, तर दुसऱ्या बाजूला AI च्या हार्डवेअर साठी आवश्यक सिलिकॉन आणि चिप्सची श्रीमंती असणारा अत्यंत नम्र चीन! बलाढ्य कॉर्पोरेशन्सची भूक देखील यामध्ये आहेच. अशा परिस्थितीत अमोदेई चीनच्या AI विकसनाच्या वेगावर नियंत्रणाचा भाबडा आशावाद दाखवतात ! येत्या काही दशकात (उशिरा उशिरा धरलं तरी) "superintelligent AI" अस्तित्वात येईल. तेव्हा त्याच्या अस्तित्वाबद्दल जसे तात्विक प्रश्न, असतील तसेच अस्तित्ववादी प्रश्नदेखील (माणसासाठी) असतील. प्रचंड आणि कल्पनातीत क्षमता असणारं हे superintelligent AI, याचं वर्गीकरण कसं करता येईल? Virus जसा सजीव की निर्जीव हा अनुत्तरित प्रश्न आहे, तसाच प्रश्न मला या येऊ घातलेल्या superintelligent AI बद्दल पडतो., सध्या philosophical असणारा प्रश्न पुढे जीवशास्त्रीय होऊ नये, अशी अपेक्षा. या superintelligent AI मध्ये कसलंही "भय" असेल का? माणसातील हिंसेवर किंवा कुठल्याही आंतरिक प्रेरणेवर शिक्षेच्या, मृत्यूच्या अथवा इतर कसल्याही भयाने मर्यादा येते. superintelligent AI ला कशाचं भय असेल? 

वाचोस्की द्वयीचा मॅट्रिक्स superintelligent AI च्या पलीकडील डिस्टोपिया दाखवतो. आणि असे अनेक डिस्टोपिक सिनेमे, साहित्य येऊन गेलेलं आहेच. आसिमॉवच्या कथांमध्ये याबद्दल भाष्य आहे. "वास्तव काय आहे?"  हा तत्वज्ञानातील प्रश्न मॅट्रिक्स मधून खूप परिणामकारकरित्या मांडला आहे. पोस्ट ट्रुथ जगात वास्तवांची समोर येणारी वेगवेगळी versions यामुळ हा प्रश्न फक्त तात्विक चर्चा राहिला नाही.  आणि आता खुद्द अमोदेई, Open AI यांनी दिलेला इशारा!!  ही Matrix युगाची चाहूल आहे काय? 


- अभिजीत कदम | १५ सप्टेंबर २०२६. 

No comments:

Post a Comment