Wednesday, 27 July 2022

त्रिज्या


 त्रिज्येच्या मर्यादेत हवं तेवढं स्वातंत्र्य उपभोग. स्वातंत्र्य; मर्यादित!

मग माझ्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा ठाकतो, मी का आहे? मी आहे का? आणि मग क्षणस्थ होताना मिळतो अस्तित्वाचा पुरावा, पण अर्थ मात्र गवसत नाही. अर्थाच्या शोधात दिसतात कित्येक वर्षांत न बदललेले तेच संघर्ष, विकासाची व्यक्तिनिष्ठ व्याख्या, शिक्षणाचं टोकन देऊन लग्नाच्या बाजारात दाखवले जाणारे प्रॉडक्ट्स. जगण्याची गर्दी, गर्दीतलं जगणं, जगण्याचा स्तर? दिवसांचे रकाने भरणारी कॅलेंडरं एकामागून एक दिवस सरकवत पुढं जाताना तोच दिवस परत परत - व्यवहाराला मान्य असणारा, जगण्याची आसक्ती ज्यासाठी - व्यवहाराला ते अमान्य. जास्त काही नको, निदान जगणं सहन करण्याइतपत तरी सगळं असावं. व्वा!


डोळ्यात भरणारे लॉंग शॉट्स, झाडींनी वेढलेल्या नदीवर पावसाळी अंधारात वाढत जाणारं धुकं आणि त्यातून प्रकट होणारा अवधूत, कातरवेळी अस्ताव्यस्त पसरलेल्या शहराच्या मागं जमलेले काळे ढग आणि त्यातून लख्ख चमकणारी वीज आणि आवाज, नेमाडे सरांच्या कवितेतील लांब लांब रस्ते, विस्तीर्ण माळरान आणि आभाळाच्या पार्श्वभूमीवर चालत जाणारा ठिपक्यासारखा अवधूत, पुलावरून जाणाऱ्या रेल्वेचं पाण्यातील प्रतिबिंब, रेल्वेतील खिडक्यांतून - माणसांच्या गर्दीच्या हलत्या कोलाजमधून दिसणारा अवधूत, रस्त्यावरील वाहनांच्या पलीकडं चौकटीतून दिसणारा तुमच्या माझ्यासारखा शंभरातील नव्यांनवांसारखा अवधूत, क्षणस्थ होऊन पाण्याचा आवाज ऐकणारा - घड्याळाची टिकटिक ऐकणारा अवधूत - जणू काही ही चित्रं असावीत अवधुतच्या न दिसणाऱ्या मनाला दाखवणारी, दुर्मिळ विशेषांच्या मध्ये भरभरून  साचलेला  मॅट्रिक्स - भुसा दाखवणारी, या चित्रांना जिवंत करणारा आवाज, ध्वनी - पावसाला जिवंत करणारा, मॅट्रिक्स जाणवू देणारा, क्षणस्थ होऊ देणारा. अधूनमधून येणारं लोकसंगीत.


अतिशय संथपणे पॅन होणारा - थांबणारा - जिवंतपणा टिपणारा कॅमेरा, फॅक्टरीमधील - गुऱ्हाळतील प्रक्रिया दाखवत अदृश्य असणाऱ्या हाडामासाच्या माणसापर्यंत पोहोचणारा, विकासाच्या खालच्या टोकाला असलेल्या अंधारातून बाहेर निघत विकासाच्या वरच्या उजेड्या बाजूखालून जात या दरीविरुद्ध पुकारलेला एल्गार दाखवणारा कॅमेरा, आदिम प्रेरणा दाखवणारे पुराणकथांतील चित्रकथीतील प्रसंग, देशीवादाशी नातं सांगणारा फिरता सिनेमा-चित्रकथी-बसमधील हिंदू ते ही चित्रकथी.


इबिझ च्या लेक्चरला गेलेलो मी, त्यावेळी पाहिलेले - दुपारी गुड मॉर्निंग म्हणायला लावणारे तथाकथित मोटीवेशनल वक्ते, आणि कोट घालून टाळ्या वाजवणारे चेहरे, त्यातलाच एक चेहरा, धावणाऱ्या शहराला पकडू पाहणारा डोळ्यात निष्पाप भाबडेपणा असलेला तो चेहरा, या चेहऱ्याकडे पाहणारा - धावून दमछाक झालेला - स्वप्नाळू आदर्शवादी बुरखा फाटून वास्तवाने रापलेला दुसरा चेहरा. असा चेहरा आपलाच चेहरा असल्यासारखा मिरवणारा जगण्याची निरार्थकता- अपरिहार्यता अंगात मुरवून घेतलेला, गावाचा पीळ न सुटलेल्या जिभेचा, अवधूत अंगात भिनलेला अभय महाजन. 


आपल्या मनातला माणसातला मातीतला अनुभव घेऊन, खोल खोल जात, उंच उंच जाऊन कियारोस्तामीजवळ नेणारा वैश्विक अनुभव देणारा अक्षय इंडीकर. 


त्रिज्या आला म्हणून पुन्हा एकदा मुबी घेतलं, पुन्हा एकदा पाहीन, आणखी काही नव्याने दिसेल. 


कुठलीही गोष्ट ऐकताना, पाहताना आपल्या जगण्याचे संदर्भ नकळत जोडले जाऊन आपला अनुभव तयार होत जातो. कदाचित गोष्ट संगणाराला वेगळं काही अपेक्षित असतं, आणि आपण आपल्या संदर्भाच्या चष्म्यातून पाहताना काही वेगळं पाहतो, ऐकतो. गोष्ट सांगणाऱ्याला सांगायचं ते खर आहे, मलाही तेच दिसलं तर तेही खरं. पण मग मला वेगळं दिसलं, तो अनुभव तर खरा होता, मग मला दिसलेली ऐकू आलेली गोष्ट खरीच असेल ना? आणि दुसऱ्या ऐकणारा-पाहणाऱ्याला वेगळं दिसलं -ऐकू आलं तर ते काय? 

खरं काय, खोटं काय, आपलं अस्तित्व खरं आहे का?

तुम्ही आहात कशावरून? तुमच्या असण्यावर शंका घ्या. 

असो, अस्तू!


- अभिजित कदम.

Saturday, 9 July 2022

FRIENDS

 #FRIENDS25


आपल्या जगण्यात एक अशी अवस्था येते की सगळं निरस वाटू लागतं, कशातच उत्साह वाटत नाही. मन कुठल्याश्या कारणानं निराश झालेलं असतं. बरेच दिवस राहणारी अवस्था असते ही. अशाच मनस्थितीत असताना माझ्या मित्रानं, किरणनं मला friends सिरीयल बद्दल सांगितलं. मी माझ्याच कोशात होतो. "असेल काहीतरी बघू"..असं म्हणून मी त्याच्याकडून दुसरा सिजन घेतला. नाहीतरी मी पिक्चर बघत होतोच. मी तो दुसरा सिजन पहिला, आणि मग झपाटल्यासारखा friends addict झालो. खरं तर friends पाहणं माझ्यासाठी एखाद्या treatment सारखं झालं. पुन्हा fresh वाटू लागलं. मी किरण आणि काही मित्र - (विजयदा, धीरज) बरोबरच friends पाहत होतो. किरण सुरुवातीला माझ्या पुढं होता, नंतर आम्ही सिजन टू सिजन बरोबर आलो. मग एपिसोड्स पहायचे आणि त्याबद्दल रोज गप्पा व्हायच्या. friends ने व्यापलेले दिवस होते ते.


Friends ची सुरुवात सेंट्रल पार्क या कॅफे मध्ये होते. पाच मित्र - रॉस, मोनिका, जोई, फिबी आणि चांडलर कॅफेमधील सोफ्यावर बसून चेष्टा मस्करी करत बसले आहेत. तेवढ्यात तिथं पांढराशुभ्र वेडिंग ड्रेस घातलेली रॅचेल येते. ती तिच्याच लग्नातून पळून आलेली असते. मोनिकाची ती बालमैत्रीण असल्यानं ती तिच्याकडं राहायला येते आणि यांच्यातलीच एक होऊन जाते. तिथून पुढची गोष्ट या सहजणांच्या रोजच्या जगण्यातल्या विसंगती, त्यातून निर्माण होत जाणारे विनोद याची आहे. या सगळ्यांसोबतच निर्जीव पण महत्वाची पात्रं आहेत त्यांचा अड्डा-सेंट्रल पार्क आणि एका बिल्डिंगमधील समोरासमोरच्या दोन अपार्टमेंट्स (आपल्या भाषेत फ्लॅट्स). त्यांच्यातल्या प्रत्येकाच्या काही अडचणी आहेत, स्वभाव विशेष आहेत, त्यातून काही किस्से घडत जातात, एखाद्याची फजिती होते, मग त्याची सगळे चेष्टा करतात. पण जेव्हा कुणी खचेलेलं असतं, निराश होतं तेव्हा मात्र "I'll be there for you" म्हणत सगळे त्याला आधार देतात. एखाद्या पात्राचा एखादा पैलू, एखादा प्रसंग आपण रिलेट करू लागतो, जेव्हा त्यांच्यात काही विनोद होतो तेव्हा त्यांच्यासोबत आपणही हसू लागतो. एखाद्या भावनिक प्रसंगात आपल्याही डोळ्यात पाणी येतं, पण ही लोकं तुम्हाला रडवत मात्र अजिबात नाहीत. एकेक एपिसोड पाहत तुम्ही कधी त्यांच्यातलाच एक होता ते समजत नाही. 


Friends बघताना नकळत तात्कालिक अमेरिकेतल्या समाजाबद्दलही काही गोष्टी समजतात. एका वयानंतर मुलांनी स्वतःच्या पायावर उभ राहणं, आपला मार्ग निवडणं. एकमेकांच्या वैयक्तिक अवकाशाला असलेलं महत्व. पॉप कल्चरचे संदर्भ. Casual नात्यानंतर कमिटमेंट आणि त्यानंतर लग्न. घटस्फोटांचं प्रमाण, पालकांच्या घटस्फोटाचे मुलांवरील परिणाम वैगेरे.

तसंच फ्रेंड्स मधून समलैंगिकता, दत्तक मूल, सरोगेट आई, एकल पालकत्व असे विषय खूप अलगद हाताळले आहेत. या सगळ्यांच्या चांगल्या वाईटबद्दल चर्चा करण्याचा काही हेतू नाहीय, आणि मालिकेमध्येही हे संदर्भ नकळत येतात, त्यावर काही गंभीर भाष्य अजिबात होत नाही. पण" आहे हे असं आहे" हे दाखवलं जातं. 


Friends बद्दल टोकाची मतंही आहेत. त्यात वारंवार येणाऱ्या casual नात्यांबद्दल, लैंगिकतेच्या संदर्भांवरून त्यावर टीका होते. Friends overrated आहे, त्यात बऱ्याच चुका आहेत, त्यात काहीच विनोदी नाही, त्यापेक्षा अनेक sitcom कितीतरी पटीने चांगल्या आहेत, पात्रं उथळ दाखवली आहेत, उगाचच friends चा उदोउदो केला जातो, त्यात मैत्रीऐवजी नात्यांबद्दलच जास्त दाखवलं आहे, विनोदी मालिका असताना उगाच गंभीर विषय घातले आहेत इत्यादी इत्यादी. एखाद्याला friends अजिबात आवडू शकणार नाही किंवा एखाद्याला ती पुन्हा पुन्हा पाहू वाटेल. आवड ही गोष्ट मुळात वस्तुनिष्ठ नाही. काही लोकांना south चे सिनेमे अजिबात आवडत नाहीत, काही लोकांना अनुराग कश्यपचे सिनेमे आवडत नाहीत, काही लोकांना लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ यांचे सिनेमे आवडत नाहीत त्यात त्यांना विनोद दिसत नाही तर काही लोकांना dark comedy सिनेमांमधील विनोद समजत नाही. याचा अर्थ असा अजिबात होत नाही की कुठलातरी एकच गट योग्य आहे आणि दुसरा अयोग्य. भिन्न मतं असू शकतात, असायला हवीत. चर्चाही व्हायला हव्यात पण हीच गोष्ट योग्य बाकी सगळं अयोग्य अशी मानसिकता चर्चेची शक्यताच संपवून टाकते.


असो, वैयक्तिक माझ्यासाठी friends खूप जवळची आहे. मी पहिल्यांदा पाहत असताना जेव्हा एक-दोन सिजन शिल्लक राहिले तेव्हा वाटायला लागलं की आता हे सिजन हळूहळू पाहावेत, पुरवून पुरवून. कारण जर सगळे सिजन संपले तर पुढं काय? सिरीयल संपूच नये असं वाटत होतं. शेवटच्या सिजनच्या शेवटचा एपिसोड पाहणं अवघड होतं. शेवटच्या भागाच्या शेवटी सगळे मोनिकाची अपार्टमेंट सोडून जातात आणि दार बंद करतात. कॅमेरा त्या रिकाम्या अपार्टमेंटमधून फिरत दाराच्या peephole वर फोकस होतो आणि मालिका संपते. त्या शेवटच्या सीनमध्ये दाखवलेल्या मोनिकाची रिकाम्या अपार्टमेंटसारखी मनाची अवस्था होते, राहते पुढचे काही दिवस, काहीतरी हरवून गेल्यासारखी. 


आज friends सुरू झाली त्याला २५ वर्षं झाली, friends २२ सप्टेंबर १९९४ ला सुरू झाली, तेव्हा मी चार वर्षांचा होतो. 

त्यावेळी कुणी सांगितलं नव्हतं की, तुम्ही जसा विचार करता तसं आयुष्यात घडत नाही, अनेक अनपेक्षित गोष्टी घडत जातात. लहानपणी गोष्टी जेवढ्या सोप्या आणि सरळ वाटतात तश्या त्या घडत नाहीत. 


"So no one told you that life was gonna be this way..."

"Your job's a joke,

You're broke,

Your love life's DOA"


जेव्हा आयुष्यात काहीच नवं घडत नाही किंवा

आपल्या मनाप्रमाणे काही घडत नाही, 

वेळ खराब चाललेली असते,


"Its like you're always stuck in second gear,

When it hasn't been your day, your week, your month,

or even your year"


तेव्हा आपले मित्रच असतात आणि ते म्हणतात की

" मै हूं ना यार"

मित्राचं हे वाक्यच या सिरीयलचं title song आहे,


"I'll be there for you,

When the rain starts to pour,

I'll be there for you,

Like I've been there before,

Cuz you're there for me too....."


आणि या गाण्यातल्या प्रत्येक शब्दांप्रमाणं सिरियलमधले सगळे जोई, मोनिका, चांडलर, फिबी, रॅचेल, रॉस सगळे एकमेकांसाठी असतात, आणि ही सिरीयल आपल्यासाठी असते "I'll be there for you" म्हणत.


आजही कधी कधी तशी अवस्था येते, निराशा किंवा अस्वस्थतेची, काही दिवस टिकणारी. अशा वेळी मी परत एकदा friends चे काही episode पाहतो, यादृच्छीकपणे, कुठलेही, मनाचं रिफ्रेश बटन आहे ते !


- अभिजित कदम.



Saturday, 27 June 2020

घायाळ बिल्लू आणि जिगरी दोस्त टपरीची गोष्ट : चमन बहार.

घायाळ बिल्लू आणि जिगरी दोस्त टपरीची गोष्ट : चमन बहार.


 
बिल्लूनं मोक्याच्या रस्त्यावर एक "चमन बहार" नावाची पान-टपरी थाटलीय, पण नेमकं जिल्ह्याचं ठिकाण बद्दलल्यामुळं तो रस्ता आता मोक्याच्या राहिला नाही, गिऱ्हाईकं एकदम कमी झालीत. अशातच त्याच्या टपरीच्या समोरच्या बरेच दिवस बंद असलेल्या बंगल्यात एक सरकारी अधिकारी राहायला येतात, त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब, आणि महत्वाचं त्यांची शहरात वाढलेली मुलगी राहायला येते. ते राहायला येतात तशी त्या शहरातून आलेल्या मुलीमागं गावातल्या मुलांची टपरीकडं वर्दळ वाढत जाते, ती टपरी अशा मुलांचा अड्डाच बनते. त्यांच्यात विशेषतः त्या भागातील काही मोठ्या धेंडांच्या मुलांच्यात त्या मुलीसाठी स्पर्धा सुरू होते. टपरी थाटलेला बिल्लूही गुपचूप तिच्या प्रेमात असतो.

बस इस टाइप की ष्टोरी है |

पण "हे चित्र कसं काढलंस?" म्हटल्यावर "कागद घेतला, पेन्सिलने चित्र काढलं,मग रंग घेतले, ब्रश घेतला आणि पेन्सिलने काढलेलं चित्र रंगवलं, झालं चित्र." एवढंच सांगितल्यावर जशी ती चित्र काढण्याची क्रिया पाहण्याचा, अनुभवण्याचा आनंद मिळत नाही, तसंच ष्टोरी सांगून चित्रपटाचा आनंद मिळवता येत नाही. (अर्थात हा चित्रपट कलात्मक प्रकारचा - arthouse आहे अस मी म्हणत नाही, anology म्हणून चित्राचं उदाहरण दिल आहे.)

मोबाईलयुग सुरू होण्याच्या पूर्वीचा काळ आहे, खूप जुना, पण लोकप्रिय ९० च्या दशकांचा नाही. गेल्या दहा वर्षांपूर्वीचा आहे. मोठ्या व्यक्तींकडंच मोबाईल असणं, एका स्थानिक राजकारण्याच्या कार्यालयात भिंतीवर ओबामाचं "hope" हे लोकप्रिय पोस्टर (!) असणं असे काही संदर्भ नकळत काळ उभा करतात. बिल्लूचं घर, त्याची टपरी, शेजारचा कॅरमअड्डा, cbz - excel गाड्या, रेंजर सायकल, गावाच्या पाट्या, टपरीशेजारच्या अड्ड्यावर जमणारं पब्लिक, अड्ड्यावरील दोन मोठे स्पर्धक, दोघांकडून फायदा करून घेणारे दोन मित्र, त्यांच्यातल्या एकाच्या खिशाला सारखं अडकवलेलं असणारं रेनॉल्ड - लेक्सीसदृश पेन, रॅपिडेक्स इंग्लिश कोर्सचं पुस्तक अशा बऱ्याच बारीकसारीक गोष्टींनी मस्त माहोल तयार केलाय. सगळ्यात भारी टपरी, शेजारचा अड्डा, आणि समोरचा बंगला आहे. त्यांच्यात कथा पुढं सरताना होत जाणारा बदल मला खूप आवडला. "चमन बहार" नावाची ती टपरी हेच मुख्य पात्र असावं इतकी मला ती आवडली. अर्धवट उडालेल्या - बदलणाऱ्या रंगाची, त्यातील "बाबा तंबाखू" वाल्यांचं घड्याळ, आरसा, लक्ष्मीचा लावलेला फोटो, गुटख्याच्या माळा, पान, नंतर बिल्लूनं लावलेली पाटी, ३१ डिसेंम्बरला खेळवलेली लायटिंग असा मेकअप केलेली, बिल्लूला लपवणारी टपरी, ...मध्येच उधळून लावलेली, कोलमडलेली... आणि शेवटी पुन्हा रस्ता ओसाड झाल्यावर, दुकानाची गिर्हाईकं कमी झाल्यावर, गुटखा माल नसणारी, एक गुलाबी कागद फ्रेम करून लावलेली टपरी. बिल्लूच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, त्याच्या भावना जणूकाही ती टपरीही व्यक्त करत होती. तो प्रेमात पडल्यावर आनंदी असणारी, त्याला "ती येईल बघ आता" असं सांगणारी, त्याला मारल्यावर स्वतःही मार खाल्लेली, ती बांगला सोडून गेल्यावर त्याच्यासारखीच उदास, रिकामी झालेली, आणि त्याच्या मनात असलेल्या तिला जपणारी ती टपरी, जणूकाही प्रेमात पडलेल्या, म्हणजे अगदी दर्दी झालेल्या मित्राची काळजी करणारे जिवाभावाचे दोस्त असतात तशीच वाटली किंवा होती ती टपरी. बिल्लू मनातलं कुणाला सांगत नव्हता, ते फक्त त्याला आणि त्या टपरीलाच माहीत होतं. त्यामुळं चित्रपटातील मला सगळ्यात आवडलेलं पात्र ती "चमन बहार" टपरी आहे.


टपरीनंतर मला आवडलेलं पात्र आहे बिल्लू, अर्थात जितूकुमारचं. त्याची "पंचायत" या वेबसिरीजमधून पहिल्यांदा ओळख झाली. त्याच काम खूप आवडलं. विशेषकरून तो जेव्हा चिडतो, रागावतो तेव्हा मजा येते. मला तर तो एक वेगळ्या प्रकारचा angry young man वाटतो. त्याच्या संतापात आदळआपट किंवा मोठ्या आवाजातील बडबड नसते, पण त्याची संतापलेली देहबोली वैशिष्ट्यपूर्ण असते. फक्त त्यानं साचेबद्ध होऊ नये किंवा तशाच भूमिका येऊ नयेत असं वाटतं. बाकी बरीच पात्रं अशा टपऱ्यांभोवती, अड्ड्यांभोवती प्रत्यक्ष जाऊन उचलली असावी अशी मजेशीर आहेत. त्या भागातील वजनदार घरांतील, त्या मुलीच्या मागावर असणारे स्पर्धक भैय्या-भाऊ-दादा चांगले आहेत, पण इतके जास्त भिडले नाहीत. त्यापेक्षा त्या भैय्या-भाऊ-दादांच्या स्पर्धेचा फायदा घेणारे, एकमेकांना आणि इतरांना "डॅड्डी" म्हणून हाका मारणारे दोन कार्टून मित्र मात्र मजेशीर आहेत. त्या भागातील एका मोठ्या सरकारी अधिकाऱ्याचा मुलगाही सुप्त स्पर्धक आहे. तो दिलजले टाइप, विषारी प्राणी आहे, तोही खूप मजेशीर आहे. एक गांजा पिणारा भगवी कपडे घातलेला विरक्ती घेतलेला बाबाही आहे. त्याचं विरक्तीचं कारण आणि ते बिल्लूला समजतं तो प्रसंग एकाचवेळी मजेशीर आणि करुणही आहे. बाकी पोलीस दमदार आहे, मुलीचे आणि बिल्लूचे आपापल्या कारणांनी कहिसे हतबल वडील, आणि इतर पात्रं आवडली. मुलीचं पात्र साकारणाऱ्या रितीकाला एकही वाक्य नसलं तरी तिचं असणं, बघणं हेच तिच्या भोवताली घायाळ करणारं वातावरण निर्माण करतं. असं वातावरण आपण कधीतरी अनुभवलेलं असतं. ती एकच असते, आणि भवतालाची कित्येक मुलं दर्दी, घायाळ झालेल्या अवस्थेत असतात. कुणी "शायनिंग मारतं", कुणी हातावर तीच्या नावाचं आद्याक्षर गोंदवून घेतं. पागल झालेले असतात सगळे. अशा तिचं पात्र आणि भवतालावरचा प्रभाव रितिका निर्माण करते.

पार्श्वसंगीत बिल्लूच्या मनातलं व्यक्त करत, आपल्याला बिल्लूशी भिडवतं. दिग्दर्शक अपूर्व बदगायियानं लिहिलेली आणि रोमी व सोनू निगम यांनी गायलेली "दिल धून धून" आणि "दो का चार.." ही गाणी खूपच आवडली. म्हणजे ट्रेलर पाहतानाच चित्रपट कसा असले याची कल्पना ट्रेलरमधील गाण्याच्या, संगीताच्या तुकड्यावरून आलेली.

एकूण मला खूपच आवडला. नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे, तिथं पहा. त्यांचा १९९ चा पॅक आहे तो घ्या. नसेल घ्यायचा तर पहिला महिना subscription मोफत आहे ते घेऊन पहा. नाहीतर मित्राचं login id आणि पासवर्ड थोड्या वेळासाठी घेऊन पहा. कृपया pirated copy पाहू नका. गेल्याच आठवड्यात सगळ्यांनी nepotism चा निषेध करणारे स्टेटस टाकले होते. या सिनेमात (माझ्या माहितीप्रमाणे) इंडस्ट्री मधील कुठला कलाकार नाही की बड्या स्टारची मुलं नाहीत. तेव्हा pirated copy पाहून त्यांचं नुकसान करू नका.

(Caution : एखाद्यादुसऱ्या प्रसंगात शिवराळ भाषेचा वापर आहे.)

- अभिजित कदम.

[ गेल्या एक-दोन आठवड्यापासून समाजमाध्यमांवर nepotism वर खूप गरम चर्चा झाली. नव्या लोकांना संधी नाकारली जाते. सलमान खानसहित सगळ्या बड्या नावांमुळं, स्टार लोकांमुळं अनेक हुशार अभिनेत्यांना संधी मिळाली नाही, मिळत नाही हे वास्तव आहे. पण आपण आजपर्यंत इरफान, तापसी, नवाज, कंगना, सुशांत सिंग, राजकुमार राव, आयुष्यमान खुराणा यांचे किती चित्रपट थिएटरला जाऊन पाहिले? यांचे पायरेटेड चित्रपट मोबाईलवर पाहायचे किंवा पहायचेच नाहीत, आणि nepotism वर चर्चा करायची हे थांबलं पाहिजे. आणि हो, मी या सगळ्यांचे चित्रपट फक्त थिएटरवर किंवा OTT प्लॅटफॉर्मवरच पाहिले आहेत. आवडला तर एकापेक्षा जास्त वेळा पाहिले आहेत. आणि हेसुद्धा खरं आहे की सलमानचे चित्रपटही ४-५ वेळा पाहिले आहेत. फक्त चुकलं इतकंच की त्याचे फालतू दर्जाहीन चित्रपटही थिएटरवर जाऊन दोन-तीनदा पाहिले. इथून पुढं ही चूक अजिबात करणार नाही. पण अर्थात मी सलमान-शाहरुख-आमिर किंवा आलीया-करण जोहर यांचेही चांगले चित्रपट (जेव्हा थिएटर सुरू होईल तेव्हा) थिएटरला पाहणार. मला टोकाची भूमिका, प्रतिक्रिया आवडत नाही, आणि न घेण्याचा प्रयत्नही असेल. बऱ्याच लोकांना अजिबात आवडत नसला, किंवा nepotism म्हणून तिरस्कार असला तरी मला सलमानचा "सुलतान" शाहरुखचा "चक दे" आमिरचा "तारे जमीन पर", "3 idiots" रणबीरचा "रॉकस्टार" आलीया चा "हायवे" हे चित्रपट थिएटरमध्येच पाहायला आवडतील, पाहीन. त्याचसोबत कंगणाचे, तापसीचे, नवाजुद्दीनचे, आयुष्यमान चे, राजकुमार रावचे, जितेंद्र कुमारचे चित्रपट आजपर्यंत थिएटरमध्येच पाहिलेत, आणि पुढेही पाहीन. ]

Monday, 20 April 2020

"All art is autobiography"




#Road_to_Roma
#Roma
#Alfanso_Cuaŕon
"All art is autobiography" साने गुरुजींच्या साहित्याबद्दलचं पुस्तक वाचताना गेल्याच आठवड्यात या वाक्याला underline केलं होतं. आणि आज watchlist मध्ये आहे म्हणून रोमा पाहिला. त्यानंतर लगेच रोमावरील documentory "Road to Roma" पहिली. दिग्दर्शक Alfanso Cuaròn चा नॉस्टॅल्जिया आणि तत्कालीन मेक्सिको याबद्दलचा हा चित्रपट एका मध्यमवर्गीय कुटुंबातील घरकाम करणारी cleo हिला मध्य मानून तिच्याभोवतीच्या परिघात व्यक्त होत जातो. एखाद्या चित्रकाराने कॅनव्हासवर चित्राच्या काही बाबी सुरुवातीला गडद पेन्सिलने ठळक काढाव्या आणि नंतर बोटानं हळुवार ठळक भागातील पेन्सिलचा रंग राहिलेलं चित्र पूर्ण करण्यासाठी वापरावा तसा चित्रपट आहे. चित्रपट पाहून लगेच हा माहितीपट आणि ते चित्र पूर्ण समजलं. चित्र कसं काढलं, ते तसंच का काढलं, ते काढताना त्यामागं कुठला विचार होता हे प्रत्यक्ष चित्रकार alfanso cuaron कडून ऐकणं आणि चित्र पूर्ण होण्याची प्रक्रिया अनुभवणं हे खूपच आनंददायक होतं. आपण प्रत्यक्ष चित्रपट पाहताना बऱ्याच गोष्टी चुकवतो (miss करतो) त्या दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून पुन्हा अनुभवता येतात. काही प्रसंग आणखी जास्त भिडतात, चित्रपटनिर्मिती प्रक्रियेबद्दलची आत्मीयता वाढते. एखादी कलाकृती पाहिल्यानंतर किंवा अनुभवल्यानंतर आपण मित्र-मैत्रिणींच्यात किंवा कुठल्यातरी अनौपचारिक व्यासपीठावर चर्चा करतो तेव्हा त्या कलाकृतीचा एखादा वेगळा पैलू आपल्याला नव्याने समजल्यावर खूप आनंद होतो. पण जेव्हा एखादा कलाकारच आपल्या कलाकृतीबद्दल अगदी मनापासून बोलतो तेव्हा ती कलाकृती आणखी सुंदर दिसते, अनेक नवे पैलू, जणू पूर्वी अदृश्य असल्यासारखे नव्याने दिसू लागतात. चित्रपट महोत्सवांदरम्यान अशी पर्वणी मिळते. तसाच अनुभव हा माहितीपट पाहिल्यावर आला. खरं तर तिला documentory किंवा माहितीपट असं रुक्ष नावही देऊ वाटत नाही, कारण एक कलाकार आपल्या कलाकृतीवर किती प्रेम करतो, तिचा आविष्कार त्याच्या मनात आहे तसा होण्यासाठी त्याची धडपड काय असते हे सांगणारी एखादी कथाच ती आहे असं मला वाटलं. बरेच कलाकार आपल्या कलाकृतीबद्दल बोलत नाहीत, किंवा त्यांना ती कलाकृती open to interpretation ठेवावी वाटते. तसं केल्याने एकतर प्रेक्षकाच्या दृष्टिकोनातून नवे पैलू समोर येण्याची शक्यता असते. नाहीतर ती कलाकृतीच तशी असते, कलाकाराच्या नकळत त्याच्या अंतर्मनातून किंवा सुप्त मनातून निर्माण झालेली. त्यामुळं काही कलाकार आपल्या कलाकृतीबद्दल बोलत नसावेत. पण इतर वेळी जेव्हा कलाकार आणि प्रेक्षक यांदरम्यान कुठल्याही माध्यमातून संवाद होतो किंवा कलाकार आपल्या कलाकृतीबद्दल व्यक्त होतो, तेव्हा ती प्रेक्षक किंवा कलारसिकासाठी पर्वणी असते. "Road to Roma" या माहितीपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक alfanso आपल्यापाशी व्यक्त होतो ही एक पर्वणीच असते. आपल्याशी बोलताना तो 'रोमा"बद्दल बोलतो, त्याच्या आठवणींबद्दल बोलतो आणि नकळत स्वतःशीही बोलतो. सिनेमा या माध्यमाबद्दल त्याचे विचार व्यक्त करतो, एखादा प्रसंग त्यानं तसाच का शूट केला, विशिष्ट camera movement च का वापरली, कलाकार कसे आणि तसेच का निवडले, एखादा प्रसंग आणि त्यातील कलाकारांच्या भावना नैसर्गिक येण्यासाठी त्याला काय करावं लागलं, "gravity" च्या वेळी त्याचा दिग्दर्शकीय दृष्टिकोन काय होता आणि "रोमा"च्या वेळी काय आहे, चित्रपटातील semiotics, "रोमा" चा त्याच्यावर दिग्दर्शक म्हणून पडलेला प्रभाव, एकंदरीत "सिनेमा" या माध्यमावरील त्याचं भाष्य या सगळ्या विषयांवर alfanso उत्स्फूर्तपणे व्यक्त होतो. म्हणून चित्रपटाबरोबरच हा माहितीपटही न चुकवण्यासारखा आहे.
- अभिजित कदम.






Saturday, 26 January 2019

MPSC, पिच्चर आणि मी : अनियंत्रित साखळी अभिक्रिया! (भाग २)

MPSC, पिच्चर आणि मी : अनियंत्रित साखळी अभिक्रिया! (भाग २)

- अभिजीत कदम.

आम्ही पुण्यात आलो. NFAI ला दहा दिवस चित्रपट रसग्रहण कार्यशाळा पूर्ण केली. आतापर्यंत फक्त नाव वाचलेल्या मृणाल सेन यांचा भुवन शोम पहिला, सत्यजित रे यांच्या apu triology मधील पथेर पांचाली पहिला. अनेक मान्यवरांची व्याख्यानं झाली. अनेक नव्या गोष्टी समजल्या, अनेक जुन्याच गोष्टी नव्याने समजल्या. राशोमोनचं screening काही कारणांनी रद्द झालेलं. किशोरदांनी राशोमोन-अकिरा कुरोसावा याबद्दल खूप सांगितलेलं, त्यामुळं खूप उत्सुकता होती, पण screening रद्द झाल्यानं वाईट वाटलं. पण मी कोल्हापूरला गेल्यावर पहिला राशोमोन मिळवून पहिला. किशोरदांनी बर्गमन यांच्याबद्दलही खूप सांगितलेलं. नंतर KIFF ला wild strawberries पाहायला मिळाला. NFAI च्या वर्कशॉपमधले लक्षात राहिलेले आणखी चित्रपट Bicycle Thieves, run lola run, the cup हे होते. Big city blues आणि आणखी एक शॉर्टफिल्म जिचं नाव आता आठवत नाही त्या लक्षात राहिल्या. अस्तू दुसऱ्यांदा पहिला, आणि कोर्ट तिसऱ्यांदा. चित्रपट पाहून झाल्यावर त्याबद्दल आत चर्चा व्हायची आणि बाहेर मी आणि किशोरदा , विषय फक्त सिनेमा. रात्री उशिरा NFAI पासून लकडी पुलाकडं चालत येत, आणि त्या पुलाच्या काठड्याजवळ उशिरापर्यंत सिनेमाबद्दल मारलेल्या गप्पा अजून आठवतात.

कार्यशाळेत डॉ. वनारसे मॅडम, गणेश मतकरी, सुषमा दातार मॅडम यांची व्याख्यानं ऐकायला मिळाली. सिनेमाच्या प्रचंड प्रेमात असणारी सतीश जकातदार , सुधीर नांदगावकर अशी माणसं पहिली.
समारोपाला गोविंद निहलानी आले होते, त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होती, पण नाही जमलं. त्यांना समोर पाहता आलं, त्यांच्यासोबत फोटो काढला. मराठीतील माझा आवडता अभिनेता गिरीश कुलकर्णी समारोपाला आले होते. त्यांच्याशी मात्र आम्हाला बऱ्यापैकी बोलता आलं. "कथा दोन गणपतरावांची" मला खूप आवडला होता. आणि त्याचे दिग्दर्शक सतीश आळेकर यांच्याशीही बोलता आलं. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर, डॉ. आगाशे यांच्यासोबत प्रश्नोत्तराच सेशन झालं अस्तूच्या screning नंतर. कोर्टमधील पब्लिक prosecutor ची भूमिका केलेल्या गीतांजली कुलकर्णी यांच्याशीही बोलणं झालं. या सगळ्यांमुळ ती कार्यशाळा कायम लक्षात राहीलच, पण त्या कार्यशाळेत एक वादळी व्याख्यान मात्र विशेषकरून आठवतं ते समर नाखातेंच. त्या एक-दीड तासाच्या सेक्शनमध्ये त्यांनी सिनेमा आणि एकंदरीत mass media कडं पाहायचा दृष्टिकोनच बदलून टाकला. सिनेमा आणि mass media समाजाला कसं नियंत्रित करतो याचा विचार कधीच केला नव्हता. अजूनही वेळ मिळाला तर त्यांची कार्यशाळा नक्की करणार आहे.






असे ते कार्यशाळेत दिवस प्रचंड भारलेले होते. ज्ञानदेव या माझ्या मित्राकड मी थांबलो होतो. सकाळी आवरून खांद्याला शबनम पिशवी अडकवून, अंगात नेहरुवजा शर्ट घालून मी निघायचो. तिथपासून झोपेपर्यंत डोक्यात आणि समोर फक्त सिनेमा, सिनेमा आणि सिनेमा होता.

कार्यशाळा ११ सप्टेंबरला संपली. १२ पासून राज्यसेवा mains होती. मी पहिल्या दिवशीचे भाषेचे पेपर दिले. पण डोक्यात फक्त आधीच्या एक आठवड्यातील सगळ्या गोष्टी फिरत होत्या. १३ सप्टेंबरला दुसऱ्या दिवशी GS चे पेपर सुरू झाले. १३ ला माझा २५ वा जन्मदिवसही होता. मी GS १ चा पेपर दिला. परिक्षागृहात मी पेपर समोर धरून बसलो होतो. अभ्यास झाला नव्हताच आणि डोक्यात सारखे ते चित्रपट घुमत होते. अभ्यास न झाल्यानं वाईट वाटलं. मी दुसरा GS २ चा पेपर दिला नाही. तसाच रूमवर आलो. माझी शबनम पिशवी घेतली, ज्यात कार्यशाळेत खरेदी केलेली पुस्तकं होती. मी अप्पा बळवंत चौकात जाऊन आणखी एकदोन पुस्तक घेतली. मग बालगंधर्व कलादालनात कुठलतरी प्रदर्शन लागलेलं ते पाहिलं आणि बाहेर येऊन पाच साडेपाचपर्यंत पुस्तकं वाचत बसलो. "अर्धसत्य" ज्या मूळ कथेवरून बनवलेला होता ती श्री. दा. पानवलकरांची बहुतेक "सुर्या" ही कथाही त्यावेळी वाचल्याचं चांगलं आठवतंय. मग संध्याकाळी रूमवर आलो. आणि दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला आलो.

त्यानंतर सलग तीन वर्षे मला राज्यसेवा पूर्व पास होता आलं नाही. दरम्यान आणखी भरपूर चित्रपट पाहून झाले. दरवर्षीचे KIFF झाले, नाट्यस्पर्धा झाल्या. पुण्यातल्या कार्यशाळेला जाण्याआधीच किशोरदांच BDO म्हणून selection झालं होतं. त्यांची सुरुवातीला रत्नागिरी आणि आता फलटणला posting झाली आणि मग परत "आली लहर केला कहर" असला कार्यक्रमही झाला नाही. KIFF साठी मला नवे जोडीदार मिळाले माझे दुसरे roommate रवीदा. कोल्हापुरातील राज्य नाट्य स्पर्धांची जवळजवळ सगळी नाटक मी, शिवराज, किरण, रवी, धीरज, अनिकेत, अनिरुद्ध सगळ्यांनी न चुकता पहिली. जवळजवळ प्रत्येक शनिवारचा release कोल्हापुरात मी मित्रांबर आणि कुणी नसेल तर एकट्याने पहिला.

दरवर्षी राज्यसेवेची जाहिरातही येत राहिली. जाहिरात आल्यावर न चुकता आणि मनापासून अभ्यास आणि परीक्षा देत राहिलो. पण एक अडचण प्रत्येकवेळी व्हायची. अभ्यास करताना एखाद्या गोष्टींबद्दलचं कुतुहल जागृत व्हायचं आणि मग त्या गोष्टीबद्दलच जास्तीत जास्त जाणून घ्यायला लागायचो आणि फिरून शेवट सिनेमात व्हायचा. म्हणजे दोन्ही एकमेकात मिसळून जायचं. मी २०१७ मध्ये "हिंदू" वाचायला घेतली. पहिली दोन-तीनच पानं वाचून झाली आणि मला जाणवलं की पाहिलं मी प्राचीन भारत नीट वाचला पाहीजे. दरम्यान राज्यसेवा पूर्वपरीक्षाही आली होतीच. मग मी जुन्या NCERT मधून प्राचीन भारत वाचायला सुरुवात केली. मग हडप्पा बद्दल आणखी वाचू वाटलं मग नव्या NCERT मधील तेवढी प्रकरण वाचली. आणि मग श्याम बेनेगल यांचे "भारत एक खोज" चे एपिसोड बघायला लागलो. यातच भरपूर वेळ गेला. बाकी विषयांना जास्त वेळ मिळाला नाही. परीक्षा पास होता आली नाही. गेल्यावर्षी "भारत एक खोज"चे राहिलेले सगळे episodes पाहिले आणि "हिंदू" वाचून पूर्ण केली. भारताच्या इतिहासात कालातीत भ्रमण करणाऱ्या आणि आदिम कृषिसंस्कृतीशी जोडलेली नाळ याची जाणीव निर्माण करणाऱ्या नेमाडेंच्या "हिंदू"साठी प्राचीन-मध्ययुगीन इतिहास माहीत असणं ही गरज होतीच. "हिंदु"बद्दलही लिहायचं आहेच, वर्तमानाच्या संदर्भात तर ती जास्तच प्रासंगिक आहे, पण त्याबद्दल नंतर लिहीन.

भारत एक खोज झाल्यानंतर "संविधान" संपवली. मग मात्र इतिहासातले काही चरित्रपट पाहिले. रिचर्ड अटेनबर्ग यांचा "गांधी", जब्बार पटेलांचा "डॉ बाबासाहेब आंबेडकर" पहिला. वेद राही यांचा "वीर सावरकर" पहिला. श्याम बेनेगल यांची पंडित नेहरुंवरील "नेहरू" ही डॉक्युमेंटरी पहिली, त्यांचाच "नेताजी बोस : द फरगॉटन हिरो" पहिला. तरी केतन मेहतांचा "सरदार" आणि जिनांवरील ब्रिटिश चरित्रपट राहिलाच. एकंदरीत २०१८ हे वर्ष माझ्या ऐतिहासिक चित्रपट महोत्सवाचं वर्ष होतं.

डिसेंबर उजाडला. १० डिसेंबर २०१८, राज्यसेवेची जाहिरात आली. मी ऐतिहासिक चित्रपट महोत्सव थांबवला. अभ्यास परत सुरू झाला. १७ फेब्रुवारी ला पूर्वपरीक्षा आहे. मला अभ्यासात चालू घडामोडी अभ्यासायला जास्त आवडतात. बरीच नवी माहिती मिळते, नव्या गोष्टी समजतात.

काल ऑफिसवरून घरी आल्यावर जेवण झाल्यावर गणितं सोडवत बसलो होतो. नंतर सकाळची वार्षिकी वाचायला घेतली. आवडीचा (आणि प्रश्न येऊ शकणारा) व्यक्तिविशेष हा भाग वाचायला सुरू केला. आणि संतुरवादक पंडित उल्हास बापट यांच्याबद्दल वाचू लागलो. त्यात पुढील उल्लेख होते :
'या वाद्यावर त्यांनी "मिंड" किमया विकसित केली आणि अविरत संशोधनातून क्रोमॅटिक संतुरचा जन्म झाला.'
पुढं पंचमदांबरोबर "घर" चित्रपटापासून त्यांनी संतूर वाजवायला सुरुवात केल्याचा आणि "इजाजत", "जैत रे जैत", "१९४२ a love story" साठी त्यांनी संतूर वाजवल्याचं वाचलं.

मी पुस्तक बंद केलं आणि youtube वर पंडित उल्हास बापट search केलं. त्यांच्या एका कार्यक्रमाचा एक video मिळाला. तो पहिला आणि मी त्यात हरवून गेलो. त्यांनी शास्त्रीय संगीत आणि चित्रपट संगीत दोन्हीत काम केलंय. शास्त्रीय सांगितातले काही जाणकार सिनेमाच्या संगिताला कमी प्रतीचं मानतात तर इंडस्ट्रीतील काही लोक शास्त्रीय संगीताला महत्व देत नाहीत. पण दोन्ही महत्वाची आहेत असही ते सांगतात. त्यांनी मिंड म्हणजे काय ते वाजवून दाखवलं. त्या व्हिडिओत त्यांनी पंचमदांना मिंडच रेकॉर्डिंग ऐकवल्याचं आणि त्यांना ते खूप आवडल्याचं सांगितलं. "तुने ये कैसे किया?" असं विचारून याचा वापर आपण करू असं पंचमदा त्यांना म्हणाले. पंचमदांनी त्याचा वापर "मेरा कुछ समान" मध्ये केल्याचं समजलं. मेरा कुछ सामान मध्ये "...पतझड है कुछ...है ना" यानंतर वाजणारं संतूर, "होठो पे बीती बात आयी है...(अंगुर)" या गाण्यात दोन कडव्यांच्या मध्ये वाजणार संतूर. गाणं ऐकताना हात नकळत ज्या आवाजाबरं हवेत फिरायचा,ते वाजणारं काय होतं याचा कधी विचार केला नव्हता पण ते आवडायचं मात्र खूप. या दोन्ही आवडीच्या गाण्यातल्या नकळत आवडत्या जागा संतूरमुळं मला आवडत होत्या. हे सगळं ऐकून मी पुन्हा ती दोन्ही गाणी बारकाईनं ऐकली आणि त्या संतुरचा आनंद घेतला. पूर्वी ती गाणी ऐकताना शब्द ऐकण्यावर भर होता. उल्हास बापटांनी पंचमदांना अगदी "१९४२ a love story" पर्यंत साथ दिली. त्यातल्या गाण्यातही त्यांचंच संतूर आहे. ते अजून ऐकायचंय. "मेरा कुछ सामान.." तर फिरून फिरून कुठल्यातरी निमित्तानं समोर येतच राहत! गुलजार नावाचा माणूस पुन्हा पुन्हा भेटत राहतो.

खरं तर अभ्यासातही शिस्त पाहिजे. मी तेवढं वाचून पुढं जायला हवं होतं. पण तेवढ्या दोन परिच्छेदांवरून मी तास-दिडतास पंडित बापटांच्या संतुरमध्ये हरवून गेलो. मग भानावर आल्यावर मला जुनं सगळं आठवलं. पण जर मी तेवढा परिच्छेद वाचून पुढं गेलो असतो तर कदाचित माझा वेळ गेला नसता, आणखी वाचून झालं असतं. कदाचित हे दोन परिच्छेद वाचले त्यावर प्रश्न येणारही नाही. पण त्या गेलेल्या दीड तासाने मला खूप आनंद दिला, त्याची किंमत नाही होऊ शकत.

अणुबॉम्बमध्ये साखळी अभिक्रिया होऊन प्रचंड मोठा स्फोट होतो. ती अनियंत्रित साखळी अभिक्रिया असते. बाहेर पडणारे neutron आणि निर्माण होणारे तिप्पट neutron हे अनियंत्रित साखळी अभिक्रियेद्वारे क्षणार्धात मोठा स्फोट घडवून आणतात. वीजनिर्मितीसाठी वापरली जाणारी अणुऊर्जा मात्र नियंत्रित साखळी अभिक्रियेतून निर्माण होते. तिथं एक शिस्त असते. माझ्या MPSC च्या अभ्यासातून बाहेर पडणारे कुतूहलाचे कण मला चित्रपटांकडे नेतात आणि तिथून परत MPSC च्या अभ्यासाकडे आणतात. अशी साखळी अभिक्रिया कधीच सुरू झालीय. अनियंत्रित साखळी अभिक्रियेत लगेच होणारा स्फोट माझ्या बाबतीत लगेच होईल. वेळ सापेक्ष आहे. आपल्यासाठी चाळीस पन्नास वर्षे म्हणजे interstellar मधील दुसऱ्या सूर्यमालेतल्या ग्रहावरील काही तास असतील. तिथल्या हिशेबान स्फोट पंधरा मिनिटं, अर्धा तास किंवा तासात होईलच. त्या स्फोटाने कुणाचं नुकसान मात्र होणार नाही. आनंद देणारा स्फोट असेल तो. तोपर्यंत MPSC च्या बाबतीत एकतर हवी ती post मिळेल नाहीतर परीक्षा देण्याचं वय संपेल. काहीतरी होईलच. सिनेमा आणि MPSC मुळं निर्माण झालेलं कुतूहल मात्र शेवटपर्यंत राहीलच.

पंडित उल्हास बापटांचा youtube वरील कार्यक्रम :

https://youtu.be/v45WeOwKk9I
https://youtu.be/Mqit4mp0Swo

(पूर्ण.)

- अभिजीत.

Friday, 25 January 2019

MPSC, पिच्चर आणि मी : अनियंत्रित साखळी अभिक्रिया!

MPSC, पिच्चर आणि मी : अनियंत्रित साखळी अभिक्रिया!

(पूर्वार्ध)

- अभिजीत कदम.


विजय तेंडुलकरांचं निधन झालं तेव्हा मी second year ला होतो. त्यावेळी रेक्टर ऑफिसच्या बाहेर बरेच पेपर असायचे. तें गेल्यानंतर तेव्हा पेपरभरून त्यांच्याबद्दल लेख आले होते. तोपर्यंत मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. मी त्यातले बरेच लेख वाचले. तेव्हा मला पहिल्यांदाच समांतर चित्रपट,सत्यदेव दुबे, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, निशांत, अर्धसत्य, सामना, सिंहासन, उंबरठा, प्रायोगिक नाटकं, सखाराम बाईंडर इत्यादी सगळ्याची तोंडओळख झाली. मी सिनेमाच्या प्रेमात लहानपणापासून होतो. मला पारंपरिक सिनेमाची तर प्रचंड आवड होती, आहेच पण शूल, एक होता विदूषक असे चित्रपटसुद्धा लहानपणी मला आवडल्याच आठवतं. तेव्हा तेंडुलकरांबद्दलचे लेख वाचून माझं या नव्याने समजलेल्या गोष्टींबद्दलचं कुतुहल वाढलं. मग पुढे बऱ्याचदा ह्याच नावांची गाठ पडत राहिली, कारण मी पेपर वाचत राहिलो, आवड म्हणून, आणि MPSC च्या अभ्यासासाठी म्हणूनही.

२०११ ला कॉलेज झाल्यानंतर MPSC चा पूर्णवेळ अभ्यास सुरू झाला.
२०११ मध्येच मी STI च्या mains ची तयारी करत होतो. तेव्हा पेपरमध्ये मणी कौल यांच्यावर आलेला लेख वाचल्याचं आठवतंय. त्यांचं निधन झालं होतं. तेव्हाही परत आणखी नवी नावांची तोंडओळख झाली - मनी कौल, ऋत्विक घटक, मृणाल सेन. परीक्षेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेले, ऑस्कर मिळालेले चित्रपट, उत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक इत्यादी गोष्टी अक्षरशः पाठ करत होतो. तेव्हा अशा यांत्रिक पाठांतराच वाईट वाटायचं, खूप इच्छा व्हायची ते चित्रपट पाहायची. पण एकतर तेव्हा अजून स्मार्टफोन,fast data, netflix, hotstar, amazon हे सगळं यायच होत आणि थिएटरला हे चित्रपट पाहायला मिळणं अशक्य होतं. पण तेव्हा अभ्यास करतानाच ठरवलं होतं जेव्हा नोकरी मिळेल तेव्हा पहिला आतापर्यंत साचलेला चित्रपटांचा अनुशेष भरून काढायचा. तोपर्यंत अभ्यासाबरोबर सिनेमाबद्दलचे पेपरमध्ये येणारे बरेच लेख वाचून काढले. समांतर सिनेमा, कलात्मक सिनेमा, व्यावसायिक सिनेमा, मसालेदार सिनेमा यांबद्दल वाचून भरपूर झालेलं नोकरी लागेपर्यंत.

नोकरी लागल्यानंतर कोल्हापूरला आल्यावर पहिल्यांदा laptop घेतला. आणि अक्षरशः तुटून पडलो चित्रपटांवर. दरम्यान MPSC राज्यसेवेच्या नाममात्र परीक्षा दिल्या. कोल्हापुरात असताना श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, गुलजार, हृषीकेश मुखर्जी, जब्बार पटेल, सुमित्रा भावे- सुनील सुकथनकर, गजेंद्र अहिरे, उमेश कुलकर्णी यांचे सलग चित्रपट dvds घेऊन लॅपटॉपवर पाहिले. म्हणजे त्या त्या दिगदर्शकांच्या चित्रपटांचे माझ्यापुरते फेस्टिव्हलच होते ते. बरोबरच प्रत्येक आठवड्याचे रिलिजेस, गोविंदा, सलमान, नाना पाटेकर, कमल हसन, लक्ष्मीकांत बेर्डे - अशोक सराफ आणि असे बरेच रूममधील वैयक्तिक - सामूहिक फिल्म फेस्टिवलही झाले.

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (KIFF) तर श्याम बेनेगल, गजेंद्र अहिरे, सुमित्रा भावे सुनील सुकथनकर यांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. गजेंद्र अहिरेंना, नाना पाटेकरांना त्यांचं पोर्ट्रेट बनवून भेट दिलं. ज्या लोकांचे चित्रपट मिळवून मी सलग बघत होतो, ज्यात हरवून गेलो होतो, त्या माणसांना प्रत्यक्षात भेटणं, त्यांच्याशी बोलणं यापेक्षा मोठा आनंद कुठला असू शकतो!





दरम्यान विजयकुमार गादेकर यांनी माझा english सिनेमाशी परिचय करून दिला होता. तोपर्यंत मला english सिनेमा हा titanic, MIB, जुरासिक पार्क, हॅरी पॉटर अशा ठारावीक फँटसी, सायन्स फिक्शन एव्हढ्यापुरताच माहीत होता. मग पहिल्यांदाच torentino ची ओळख झाली. मग मी माझा एकट्याचा torantino film festival उरकून घेतला. मग एकट्याचा Nolan film festival आणि मग Scorsese, David lynch, David Fincher यांचे सलग बरेच चित्रपट पाहिले. एकट्याचा चार्ली चॅप्लिन फेस्टिवल (richard Attenborough यांच्या चॅप्लिनसह) उरकला. इतरही बरेच single english चित्रपट पाहिले. माझ्या आवडीला माझे त्यावेळचे बॉस गुरव सर यांनीही प्रोत्साहन दिलं, त्यांनीही मला बरेच चित्रपट पाहायला सुचवले, माहिती दिली. अनुराग ने बरेच चित्रपट सुचवले. कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळं (KIFF) जागतिक आणि प्रादेशिक सिनेमाचा परिचय झाला.

कोल्हापूरला माझ्यासारखाच एक पिच्चरवेडा माणूस, किशोरदा room mate म्हणून भेटले. या मित्रांमुळं, KIFF मुळं, एकंदरीतच कोल्हापूरमुळं सिनेमाबद्दल खूप काही कळलं, खूप चित्रपट पाहिले. या सिनेमाच्या कैफात एक शॉर्टफिल्मही लिहिली, बनवली. बोलण्यातही सिनेमाशिवाय विषय नसायचा. (अजूनही असतोच). कोल्हापूरमधील पहिली दोन वर्षे तर सिनेमानं अक्षरशः झपाटलेली वर्षं होती. आणि हो, दरम्यान कलामहर्षी भालजी पेंढारकर फिल्म सोसायटीचा सभासद झालो होतो. त्यामुळं दर महिन्याला दोन जागतिक / भारतीय प्रादेशिक सिनेमे पाहायला मिळायचे ते वेगळंच.

२०१५ मध्ये किशोरदा रत्नागिरीवरून आणि मी कोल्हापूरवरून पुण्यात आलो, NFAI च्या १०व्या चित्रपट रसास्वाद शिबिरासाठी. ६ ते ११ सप्टेंबर २०१५ असं ६ दिवस ते शिबिर होतं. दरम्यान मी MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा क्लिअर झालो होतो आणि मुख्य परीक्षा १२ ते १४ सप्टेंबर २०१५ ला होणार होती. परिक्षाकेंद्र होतं पुणे. आणि १३ सप्टेंबर २०१५, मी २५ वर्षांचा होणार होतो, माझा २५ वा वाढदिवस होता. सिनेमाच्या नादाला जास्त गेला की आयुष्यातही असलंच काहितरी फिल्मी होतं. तेव्हा २०१५ च्या सप्टेंबरमध्ये काय झालं ते उद्या लिहितो. आणि आज अचानक हे सगळं का लिहू वाटलं याबद्दलही उद्याच सांगतो. .... 

Saturday, 4 August 2018

आठवणींच्या पलीकडं... Beyond Memories...( Eternal Sunshine of the Spotless Mind)

आठवणींच्या पलीकडं... Beyond Memories...( Eternal Sunshine of the Spotless Mind)
- अभिजीत कदम.



तुम्ही एकमेकांना पहिल्यांदा भेटता, मग पुन्हा पुन्हा भेटता, एकमेकांबद्दल आवड निर्माण होते...मनं गुंतत जातात, मग तुम्ही प्रेमात पडता. या सगळ्यात काही खूप अमूल्य क्षण असतात, जेव्हा तुमचा हात तिच्या / त्याच्या हातात असतो, तुम्ही एका शांत ठिकाणी आपल्या स्पेशल व्यक्तीबर असता, अत्यंत भारलेला क्षण असतो, असं वाटतं की पूर्ण आयुष्याचा केंद्रबिंदूच आहे तो क्षण, असा क्षण, जेव्हा तुम्हाला वाटतं की यानंतर मृत्यू आला तरी चालेल. तो क्षण निघून जातो. तुम्ही दोघंही असे क्षण अनुभवत, आठवणी निर्माण करत पुढं जात असता.... मग काहीतरी बिघडू लागतं. तो/ती possesive झालेत अस तुम्हाला वाटू लागतं. छोट्या गोष्टींवरून खटके उडू लागतात. नेहमीच होत जातात या गोष्टी....कधी कधी प्रश्न सुटतात. पण कधीकधी हे इतकं वाढत जातं की तुम्हाला त्याचा / तीचा राग येऊ लागतो, नकोसे होतात ते....असह्य होतं सगळं.

असं फक्त तो आणि तिच्या बाबतच घडत नाही, तर वेगवेगळ्या परिस्थितीत होतं. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात नको वाटू लागते, पण आपण त्या व्यक्तीला सोडूही शकत नाही, कारण आपण आपल्याला माहिती असतं की आपल्याला आठवणी जगून देणार नाहीत, ते अमूल्य क्षण सारखे छळत राहणार...

... पण जर फक्त एखादी व्यक्ती आणि फक्त तिच्यासोबतच्या आणि तिच्या सगळ्या आठवणीच स्मृतीतून काढून टाकता आल्या तर??? कुठल्याशा दवाखान्यात अशी memory erase करता आली तर??

या चित्रपटाचा पटकथालेखक चार्ली कौफमनने ही कल्पना कशी सुचली याचा किस्सा एका मुलाखतीत सांगितला आहे. (मुलाखतीची link खाली दिली आहे.)
या सिनेमाचा दिग्दर्शक मिशेल आणि त्याचा मित्र बिस्मथ एकदा असेच बोलत असताना या प्रश्नापाशी येऊन थांबले. त्या दोघांनी एक प्रयोग करून पाहायचं ठरवलं. त्यांनी लोकांना त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या नावे पत्र पाठवायची ठरवली. ज्यांना पत्र पाठवणार होते त्यांना उद्देशून असं लिहिण्यात येणार होतं की "तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मेंदूमधून फक्त तुमची स्मृती कायमची पुसली गेली आहे, बाकी सगळ्या स्मृती तशाच आहेत." त्यांना असं करून लोकांच्या प्रतिक्रिया पाहायच्या होत्या. प्रत्यक्षात हा प्रयोग त्यांनी केला नाही. मात्र नंतर मिशेलने पटकथालेखक चार्लीला या चर्चेबद्दल सांगितलं, आणि चार्ली म्हणाला की यावर एक relationships बद्दल चित्रपट होऊ शकतो आणि चार्लीने पटकथा लिहिली. वाचताना जरी दोन ओळीत वाचून झालं असलं तरी प्रत्यक्षात चित्रपट तयार व्हायला मात्र बरेच दिवस गेले.


सिनेमात जिम कॅरी ने जोएल साकारलाय तर केट विंसलेटने क्लेमेंटाईन साकारलीय. भिन्न स्वभावाची दोघ रिलेशनशिपमध्ये असतात, पण वर सांगितल्यासारखा दुरावा खूप वाढतो, आणि त्यात क्लेमेंटाईन भावनेवर निर्णय घेणारी, लहरी असते. ती भावनेच्या भरात जोएलच्या स्मृती पुसन टाकते. तशी सोय एका क्लानिकमध्ये उपलब्ध असते. मग त्या क्लीनिकमधून आलेलं एक पत्र जोएलला मिळतं ( जसं पत्र मिशेल लोकांना पाठवून प्रयोग करणार होते. )
" क्लेमेंटाईन च्या स्मृतींमधून जॉइलच्या स्मृती पुसून टाकण्यात आल्या आहेत. कृपया त्यांच्या नात्याबद्दल तिला काही सांगू नये ". जोएलला वाद मिटवून नवी सुरुवात करायची असते, हे पत्र हातात पडल्यावर तो तडक तिच्याकडं जातो तर खरच ती त्याला ओळखतंच नाही. व्हॅलेंटाईन डे थोड्या दिवसांवर आलेला असतो. त्याला त्यापूर्वी रिलेशन पहिल्यासारख करायचं असतं. पण हे सगळं झाल्यावर हो हतबल होतो. आणि मग तोसुद्धा ही प्रक्रिया करून क्लेमेंटाईनला त्याच्या स्मृतींमधून पुसून टाकण्याचा विचार करतो आणि त्या डॉक्टरला ती प्रक्रिया करण्यासाठी भेटतो. काही काळानं त्याच्यावर प्रक्रिया सुरु होते. त्याच्या मेंदूवर चाललेल्या प्रक्रियेदरम्यान त्याला भूल देऊन झोपवलेलं असतं, आणि सिनेमाचा पुढचा बराच भाग त्याच्या सबकॉन्शसमध्ये घडतो. मग तो त्याच्याच स्मृतींमध्ये जातो ज्या स्मृतींमध्ये क्लेमेटाईन असते, आणि उलट्या क्रमाने एकेक आठवणीत जातो, आणि ती आठवण पुसली जाते, मग आणखी पूर्वीच्या आठवणीत. अशी तिच्या आठवणी पुसायची प्रक्रिया सुरू होते. सुरुवातीला त्याचा गोंधळ होतो कारण तो घडून गेलेल्या घटना पुन्हा अनुभवू लागतो, जागा असल्यासारखा! सबकॉन्शसमध्ये असताना, जुन्या आठवणी जगताना मग त्याला कळून चुकतं की जे घडतंय ते खरं नाहीय, त्याच्या मनात चाललंय, आणि त्याच्या आठवणी पुसल्या जात आहेत. तो जसजसा तिच्यासोबतच्या जुन्या आठवणी जगू लागतो तसं त्याला कळून चुकतं की आपण अजूनसुद्धा खूप प्रेम करतो हिच्यावर... आता मात्र त्याला खूप पश्चाताप होतो, पण कितीही प्रयत्न केले तरी त्याला जाग येत नाही, तो सबकॉन्शसमधून बाहेर पडू शकत नाही, आणि त्यांच्या आठवणी नष्ट व्हायची प्रक्रिया सुरूच राहते. मग तो त्याच्या मनात क्लेमेटाईनला खोलवर लपवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तिची आठवण पुसली जाणार नाही. तो त्यासाठी अशा आठवणीही निवडतो, ज्या आठवणी आपल्याला माहिती असूनही आपण कधी त्यांची आठवण काढत नाही. काही अत्यंत कटू आठवणी, किंवा अशा आठवणी ज्यात आपण लाजिरवाण्या प्रसंगातून गेलेलो असतो. तो अशासाठी तिला अशा आठवणींमध्ये घेऊन जातो जेणेकरून तिची आठवण मनात खोलवर पुरून ठेवता येईल आणि तिची आठवण डॉक्टरना पुसता येणार नाही. तो तिची स्मृती वाचवून ठेऊ शकतो का? आणि पुढं काय होतं हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहा!

हे सरळ सांगितलेलं असलं तरी चित्रपट मात्र सरळ पुढं जात नाही. narrative आणि editing नॉन linear आहे, तसंच मनात घडत असलेले प्रसंग surreal आहेत. पण चित्रपटात अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळं आपण कुठला प्रसंग वर्तमानात घडतोय आणि कुठला प्रसंग आधी घडून गेलेला आहे हे समजतं. आधी सांगितल्याप्रमाण क्लेमेंटाईन लहरी, मनात जे आलं ते लगेच करणारी, आणि सिनेमात म्हटल्याप्रमाणे impulsive असते. ती तिच्या केसांना वेगवेगळे color करत असते. चित्रपट पाहत असताना सुरुवातीपासूनच जर तिच्या केसांचे color मधील बदल नीट पाहिले, तर chronology समजू शकते. चित्रपटात काही प्रसंग पुन्हा घडताना दिसतात. कधी कधी संभ्रम निर्माण होतो तेव्हा असे बारकावे लक्षात घेतले तर लगेच समजतं की तो प्रसंग कधी आणि कुठं घडलाय. हा चित्रपट येण्याआधी 2000 मध्ये अशाच स्मृती नष्ट होण्यावर आणि narrative व editing नॉन linear असणारा memento येऊन गेलेला होता. चार्ली दुसऱ्या प्रोजेक्टस मध्ये गुंतलेला असल्यानं त्याला पटकथा लिहून पूर्ण करायला खूप वेळ गेलेला आणि या दरम्यानच memento येऊन गेला. सगळीकडं त्याची चर्चा सुरू होती. यामुळं निराश होऊन चार्ली चित्रपट सोडून देण्याच्या विचारात होता. पण त्याला समजावून त्याच काम पूर्ण करायला लावलं गेलं. त्यानं चित्रपट लिहून पूर्ण केला. Eternal Sunshine ला 2004 चा सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा वर्गातील Academy Award (Oscar) मिळाला.
हा चित्रपट स्मृती नष्ट होण्यावर आणि narrative व editing नॉन linear असणारा असला तरी यात आणि memento मध्ये याशिवाय कुठलंच साम्य नाही. यात memento च्या contrast मध्ये सिलेक्टिव्ह मेमरी लॉस आहे.

पूर्वी मी जिम कॅरीचे dumb and dumber आणि the mask पाहिले होते. दोन्हीतला जिम खूप energetic होता, dumb मध्ये खूप बडबड्या आणि धुडगूस घालणारा होता. या चित्रपटात मात्र जिम खूप introvert, शांत serious आहे. तो त्याच्या एका डायरीत (जी नेहमी त्याच्यासोबत असते ) चित्रं रेखाटत असतो, लिहीत असतो. जिमचा अभिनय खूपच उत्कट आणि realistic वाटतो. Wiki वरील पेजवर सांगितल्यानुसार शूट सुरू होण्यापूर्वी एक वर्ष जिमचा ब्रेकअप झाला होता. जिम आणि मिशेलचा एक interview youtube वर आहे. त्यात जिम म्हणतो की त्याच्यासाठी हा चित्रपट एक भावनिक प्रवास होता, त्याला चित्रपट करताना भूतकाळाची परीक्षेला परत बसल्यासारखं वाटलं. चित्रपटात एक प्रसंग आहे, ज्यात जोएल स्मृती नष्ट करणाऱ्या डॉक्टरला त्याच्या कॅलेंमेटाईनसोबतच्या सगळ्या आठवणी सांगत असतो, आणि पुढच्या प्रक्रियेसाठी डॉक्टर ते सगळं टेपमध्ये रेकॉर्ड करत असतो. जिम youtube वरील त्या मुलाखतीत पुढं सांगतो की तो या प्रसंगासाठी, improvise करण्यासाठी पुन्हा त्याच्या भूतकाळाला सामोरं गेला. त्यानं त्याच्या ex च नाव न घेता त्याच्या भूतकाळाबद्दल टेपमध्ये रेकॉर्ड केलं. ते रेकॉर्डिंग शूटिंग दरम्यान सगळे ऐकत असत, त्यातून काही inputs मिळण्यासाठी. जिमच्या त्या मुलाखतीत / making video मध्ये असच एकदा त्याचं खरं रेकॉर्डिंग ऐकतानाच शूटिंग आहे. त्यात जिम केटला त्याच रेकॉर्डिंग ऐकवत आहे, ऐकताना तो अचानक टेप थांबवतो आणि उचलून फेकून देतो. मग त्याचा बांध सुटतो आणि तो रडताना दिसतो, आणि केट त्याला सांभाळताना. या सगळ्या गोष्टींमुळ असेल किंवा नसेल, पण जिमचा अभिनय खूपच खरा वाटतो, भिडतो.
केटच पात्र खूपच उत्साही, लहरी, अल्लड, बिनधास्त आहे, कधी कधी तिला पाहताना जब वी मेट मधील गीत आठवते. तिनंही खुप सुंदर काम केलंय. केटचे पूर्वीचे सिनेमे बहुतेककरून Period - historic असे होते. हा सिनेमा आणि पात्र तिच्यासाठीही वेगळे होते. जोएलच्या शांत पात्राच्या विरुद्ध तिचं बडबडी पात्र गती, उत्साह आणतं.

सिनेमाचा soundtrack सुद्धा खूप सुंदर आहे. काही प्रसंग संगीतामुळं मनाला भिडतात. आणखी एक trivial तरीही interesting गोष्ट म्हणजे एका प्रसंग आहे ज्यात क्लेमेंटाईन जोएलला घरी बोलावते. ते गप्पा मारत ड्रिंक घेत असताना पार्श्वभूमीला मंद आवाजात हिंदी गाणी ऐकू येतात. पहिल्यांदा "तेरे संग प्यार मे..." मग " मेरा मन तेरा प्यासा..", आणि शेवटी "वादा ना तोड..!"

बरीच दृश्यं ही मनातील-आठवणीतील-सबकॉन्शसमधील असल्यानं surreal आहेत त्यामुळं खुप मजेशीर आणि चमत्कारिक आहेत. स्मृती पुसण्याची प्रक्रिया चालू असल्यानं आपण ज्या आठवणीचं दृश्य पाहतो त्यातील वस्तू - property किंवा सिनेमाच्या भाषेत ज्याला mise en scène म्हणतात त्यातील एकेक गोष्ट गायब होत जाते किंवा रूपांतरित होत जाते आणि शेवटी त्या आठवणीतून क्लेमेंटाईन गायब होते, म्हणजेच पुसली जाते. मग पुढच्या आठवणींवर प्रक्रिया. तिच्या आठवणी पुसण्याचा क्रम हा अगदी ताजी आठवण पहिल्यांदा पुसण्यापासून होतो आणि मग पूर्वीच्या आठवणींकडं सरकत जातो. मिशेलने बरेच surreal प्रसंग आर्टिफिशल स्पेशल इफेक्ट न वापरता चित्रित केलेत. काही दृश्यं पाहतानाच आश्चर्य वाटतं की हे कसं केलं असेल. याबद्दलही जिम आणि मिशेलच्या मुलाखतीत/making व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं आहे, ते प्रसंग कसे शूट केले ते दाखवलं आहे. त्याची लिंक खाली दिली आहे.

चित्रपटाचं नाव हे एका Elosia to Abelard या इंग्रजी दीर्घकवितेतील आहे. त्या कवितेत एक quote आहे, त्या quote चा उल्लेख सिनेमातही एका उपकथानकात येतो.

"How happy is the blameless vestal's lot!
The world forgetting, by the world forgot.
Eternal sunshine of the spotless mind!
Each pray'r accepted, and each wish resign'd"

त्या मूळच्या इंग्रजी कवितेतली मुलगी तिच्यापेक्षा १४ वर्षांनी मोठ्या असलेल्या शिक्षकाच्या प्रेमात पडते, ते दोघ लग्न करतात पण ते लग्न समाजमान्य नसल्यानं त्यांना वेगळं व्हावं लागतं. तो शिक्षक, Abelard हा monk बनतो आणि ती nun बनते. परत बऱ्याच काळानं तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम उत्पन्न होतं तेव्हा ती दोघ एकमेकांना पत्र पाठवतात. पण त्यांना कळून चुकतं की दोघांचे विचार आता जुळत नाहीत. हे समजल्यावर ती खूप दुःखी होते आणि पूर्ण आयुष्य एकटं जगायचं ठरवते. मग ती nun बनून राहात निरपेक्ष एकांत जीवन जगते. या ओळींची अनेक interpretations आहेत, त्यातल्या एकानुसार असं निरपेक्ष निरिच्छ आयुष्य जगतानाच्या तिच्या आयुष्याबद्दल या ओळी बोलतात. मूळ कवितेच्या या विषयावर चित्रपटातही एक tragic उपकथानक आहे.

या कवितेची सिनेमाच्या संदर्भातही बरीच वेगवेगळी interpretations मी काही वेबसाईट्सवर वाचली, पहिली. एका interpretation नुसार भूतकाळ, त्रास देणाऱ्या आठवणी विसारल्यावर निरपेक्ष मनाला मिळालेल्या आनंदासाठी Eternal sunshine of the spotless mind हे title वापरलं आहे. तर आणखी एका ठिकाणी blameless vestal हा शब्द जोएल आणि क्लेमेटाईनच्या रिलेशनशिपमधील नावीन्य असणाऱ्या सुरुवातीच्या निष्पाप, भारलेल्या phase साठी वापरला आहे आणि रिलेशनशिपमधील सुरुवातीची phase जशी कुठल्याही प्रश्नांशिवाय-वादरहित असते, त्या काळातील नातं हे बहरलेलं असतं. दोघांच्या मनातही एकमेकांबद्दल कुठला किंतु नसतो, शंका, चीड नसते, त्यासाठी Spotless Mind म्हटलंय.

असो, आणखीही वेगळे, सुंदर अर्थ निघतील. याचं आणखी वेगळं interpretation असेल तर मलाही सांगा.

एकंदरीत कधी कधी रिलेशनशिपमध्ये एक वेळ येते, आपल्याला वाटतं,

"तार्रुफ़ (ओळख) रोग हो जाये तो
उसको भूलना बेहतर
ताल्लुक (नातं) बोझ बन जाये तो
उसको तोड़ना अच्छा...
चलो एक बार फिर से,
अजनबी बन जाये हम दोनो..."

तेव्हा आपल्या स्मृती नष्ट तर नाहीत करता येत, पण आपण break up चा विचार करतो. पण वेगळं होऊन जर तुम्हाला
"एक सौ सोला चांद कि रातें,
एक तुम्हारे कांधे का तिल,
गीली मेंहदी कि खुशबू,
झुठ-मूठ के शिकवे कुछ,
झूठ-मूठ के वादे भी सब..." हे सगळं आठवणीत येऊन त्रास देणार असेल तर पुन्हा एकदा विचार करा.


कोल्हापूरमधील रविवारची एक निवांत सकाळ होती. बाहेर पाऊस पडत होता. मी घरी एकटाच होतो, आणि रविवारच्या पावसामुळं अंगातून आळस जात नव्हता. तेव्हा मी अंथरुणात निवांत बसून "eternal sunshune.." पाहिला. एकदा पहिला आणि मग लगेच सलग दुसऱ्यांदा पाहिला. आवडला तर अफाटच होता, आणि काही missing links सुद्धा होत्या. दुसऱ्यांदा पाहताना बऱ्याच नव्या गोष्टी दिसल्या, समजल्या ज्या माझ्या आधी लक्षात आल्या नव्हत्या. चारच्या सुमारास मी मोबाईल बाजूला ठेवला. त्यातले काही sountrack youtube वर मिळालेले ते ऐकत बसलो. बाहेर थोडी झिरझिर सुरू होती. मग त्या बारीक झिरझिरीत बाहेर जाऊन चहा पिऊन आलो. पूर्ण दिवस आणि पुढचे तीन-चार दिवस मी त्याच mood मध्ये होतो. नंतर आणखी दोनदा पहिला, त्याबद्दल वाचलं, ऐकलं, पाहिलं. I just love it!

Netflix वर उपलब्ध आहेच, आणखी कुठले स्रोत असतील तिथून घेऊन पहा. पाहणार असाल तर हेडफोन लाऊन आणि मध्येच न थांबता पहा. कदाचित पहिल्यांदा पाहिल्या पाहिल्या बऱ्याच जणांना समजेल, कदाचित नाही. आवडला पण पूर्ण समजला नसेल तर परत नक्की पहा, नक्की समजेल आणि नवीन काहीतरी गवसेल.

- अभिजित कदम.

• चार्ली कौफमनची मुलाखत : https://youtu.be/3vhsStpeKfE
• जिम कॅरी आणि मिशेल चा मेकिंग चा व्हिडीओ : https://youtu.be/r3ok1W-8Ds8
• चार्ली आणि मिशेलची मुलाखत : https://www.dvdtalk.com/interviews/charlie_kaufman.html